रेल्वेचा प्रवास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. रेल्वे इंजिनाचा शोध लागल्यानंतर केवळ दोन शहरांमधील अंतर कमी ,झाले नाही तर लोकांना रेल्वे प्रवासाच्या आठवणींचा एक खजिनाच उपलब्ध करून देण्यात आला! रेल्वेचा शोध लागल्यानंतर आजतागायत तिच्यात अनेक बदल झाले आणि करोडो लोकांनी तिच्यासोबत प्रवास केला!
परंतु जगातील पहिलीवहिली रेल्वे कुठे आहे माहिती आहे का? तर ती आहे इंग्लंडमधल्या लीड्स या शहरात,चक्क चालू स्थितीत! तब्बल २६० वर्षांपासून ती अविरतपणे आपली सेवा बजावत आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे! १७५८ मध्ये संसदीय कायद्यानुसार तिची निर्मिती करण्यात आली. मिडल्टनच्या खाणीतील कोळसा लीड्सच्या कारखान्यांमध्ये वाहून नेण्यासाठी तिचा वापर होत असे. त्याकाळी सर्व रेल्वे ह्या लाकडापासून बनविल्या जात असत. तसेच वाफेच्या इंजिनाचा उपयोग ब्लास्ट फर्नेस आणि पाणी उपसण्यासाठी केला जात असे. परंतु रेल्वेसाठी इंजिन म्हणून कोणी अजून त्याचा वापर केला नव्हता!








