काही माणसं जन्माला येतात ती प्रचंड कर्तृत्व गाजवण्यासाठीच. त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या त्यांच्या प्रांतात त्यांनी केलेली कामगिरी इतकी अचाट असते, की काळाची पानं कितीही उलटली तरी त्यांचं नाव विस्मरणात जात नाही. उलट ते जास्तच ठळकपणे पुढे येत राहतं. अशाच एका माणसाची ही गोष्ट.
त्याचं वय होतं अवघं २२, पण वजन होतं तब्बल ३४० पौंड. अंगासरशी घट्ट बसलेल्या शर्टाच्या बाह्यांमधून त्याच्या दंडाचे पिळदार स्नायू जणू फुरफुरत होते, एक नवा विक्रम करण्यासाठी शिवशिवत होते. जमलेले प्रेक्षक गंभीर चेहऱ्याने, श्वास रोखून बघत होते.









