मृत्यू साजरा करायचा असतो, मृत्युला घाबरण्यासारखं काहीही नसतं’ असं म्हणणाऱ्या अध्यात्मिक गुरु रजनीश “ओशो” यांच्या मृत्यूला १९ जानेवारी रोजी ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना नैसर्गिक मृत्यू आला की त्यांच्या मर्जीतल्या काही खास लोकांनी त्यांना संपवलं,अशा विवादाचे वादळ अजूनही घोंगावते आहे.
त्यांच्या अनेक शिष्यांचा असा संशय आहे की रजनीश यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. हे सर्व काही हजारो कोटींची मालमत्ता ताब्यात घेता यावी म्हणूनच घडले असावे, असा त्यांचा संशय आहे. या संशयाला पुष्टी देणारी अनेक कागदपत्रं आणि अनेकांच्या प्रत्यक्ष साक्षी देखील उपलब्ध आहेत. मुंबई हायकोर्टात त्यांचे एक शिष्य योगेश ठक्कर यांनी दाखल केलेला खटला अजूनही चालूच आहे. १९ जानेवारी १९९० रोजी दुपारी १ वाजता काय घडले आणि त्यानंतर गेल्या ३४ वर्षांत काय घडले याचा आढावा आज बोभाटाच्या लेखात घेऊया.










