काही गाणी, काही कविता ह्या प्रेरणादायक असतात. अशा गोष्टी मग त्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या मानबिंदू ठरतात. अशा प्रेरणादायक गीतातून सर्वानुमते एका गीताची निवड होते तेव्हा त्या गीताला राष्ट्रगीत म्हटले जाते. थोडक्यात गीत, राष्ट्रीय गीत आणि मग राष्ट्रगीत असा हा प्रवास असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी बरीच प्रेरणादायी गीतं होती. त्यामध्ये बंकिमचंद्र कृत 'वंदे मातरम' आणि रवींद्रनाथ टागोर कृत 'जन गण मन अधिनायक जय हे' या दोन गीतांना अग्रक्रम होता.
विशेषतः सुरुवातीच्या काळात वंदे मातरम ही जणू स्वातंत्र्याची रणघोषणा होती. बंकिमचंद्रांनी मात्र हे गीत मातृभूमीला वंदना म्हणून लिहिलं, ते पुढे त्यांनी आपल्या 'आनंदमठ' कादंबरीतही घेतलं. १८८० -८२ सुमाराचा हा काळ होता. अर्थात ह्या गीताबद्दल दोन-तीन जन्मकथा सांगितल्या जातात. मात्र एक नक्की, बंकिमचंद्रांना आपल्या गीताच्या सामर्थ्याची खात्री होती.












