सुरस आणि चमत्कारिक किस्से - भाग १ : नात्यांतल्या नात्यात लग्न केल्याने बुडालेली ५ बलाढ्य साम्राज्ये!
एक गाव असतं. गावात एक जोडपं असतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. दोघेही लग्न करायचं ठरवतात. समस्या अशी असते की दोघांमध्ये रक्ताचं नातं असतं, त्यामुळे लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध असतो. गावात एक दंतकथा प्रसिद्ध असते. रक्ताच्या नात्याने जोडलेल्या मुला-मुलीत लग्न झालं तर त्यांच्या पोटी घोरपड जन्मेल किंवा काहीतरी वाईट घडेल. त्यांच्याच कुटुंबातील एकाने असा प्रयत्न केला होता तेव्हा जन्मेलेलं मुल डुकराचं शेपूट घेऊन जन्मलं होतं.
पण दोघेही आपल्या मतांवर ठाम राहतात. ते गाव सोडतात. त्यांच्यासोबत गावातली काही इतर कुटुंबंही गाव सोडतात. हा नवा कबिला एक नवीन गाव वसवतो. कालांतराने गावाचं रुपांतर शहरात होतं, समृद्धी येते. पण एकाच रक्तात लग्न झाल्याने त्यांच्या भाग्यात जे लिहिलेलं असतं ते टळत नाही. त्यांची मुलं सुदृढ जन्मतात, मात्र त्यांनी वसवलेलं गाव १०० वर्षांच्या आतच वादळाने या पृथ्वीवरून कायमचं नष्ट होतं. दोघांच्या पोटची एकही पिढी अस्तित्वात राहत नाही. ती माणसं आणि ते गाव कधी नव्हतंच अशा प्रकारे लोक त्यांना कायमचं विसरतात.












