१९९१ साली त्यांनी नरेश नावाच्या ९ महिन्याच्या मुलाचं अपहरण केलं. नरेश खूप रडायचा म्हणून कंटाळून त्यांनी त्याला एवढं मारलं की त्याचा जीव गेला. आणखी एका भावना नावाच्या मुलीचं त्यांनी अपहरण केलं होतं. या मुलीच्या तोंडात त्यांनी बोळा कोंबला, तिला एका बॅगेत भरलं आणि नंतर तिला एका सिनेमागृहाच्या शौचायालात नेऊन पाण्यात बुचकळून मारलं.
ही सगळी मुलं १ ते १३ वर्षाखालील होती. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण, समारंभ अश्या जागा हेरून तिथून या मुलांना उचलण्यात आलं होतं. हा अपहरणाचा आकडा सरकारी आकड्यापेक्षा मोठा होता, कारण कित्येक तक्रारी नोंदवल्याच गेल्या नव्हत्या. या पळवून आणलेल्या लहान मुलांना भीक मागायला लावणे, त्यांना दुखापत करून सहानुभूती मिळवणे हे उद्योग अंजनाबाई आणि तिच्या मुली करत होत्या. वेळ येईल तेव्हा त्यांना वस्तू फेकावी तसं फेकुनही देत. कित्येक बालकांना यांनी भिंतीवर आपटून मारलं. कुणाचा गळा दाबला तर कुणाला अमानुषपणे उलटं टांगून मारलं. मुलं लहान असेपर्यंत त्यांचा उपयोग होई पण थोडी कळत्या वयाची झाल्यावर काय ? त्यांनी गुपित बाहेर कुणाला सांगितले तर? यावर एकच उपाय....मुलांना ठार मारणे!