सिनेमांमध्ये बऱ्याचवेळा व्हिलनचा रोल केलेला सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र हिरो ठरला आहे. मुंबईत अडकलेल्या स्थलांतरितांना परत त्यांच्या घरी पाठवण्यासाठी या भाऊने कंबर कसली आहे. सोनू सूद स्वखर्चाने स्थलांतरितांना त्यांच्या गावी पाठवत आहे.
सोनू सूद आणि त्याची व्यावसायिक मैत्रीण निती गोयल यांनी घर भेजो मिशन सुरू केले आहे. या मोहिमेद्वारे कामाच्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गेल्या १० दिवसांत त्यांनी कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये २१ बसेस पाठवल्या आहेत. या बसेसमधून जवळपास ८०० स्थलांतरित आपल्या गावी जाण्यात यशस्वी झाले. गुरुवारी एकाच दिवशी १० बसेस बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्यात आल्या, पुढील १० दिवसांत बंगाल, झारखंड आणि आसाम या राज्यांमधील स्थलांतरितांना घरी जाता यावे यासाठी सोनू १० बसेस पाठवणार आहे.








