हा खरंतर मूळचा आर्किटेक्ट. पण सध्या फोटोग्राफी करतोय. हा आहे स्पॅनिश कलाकार पाऊ बस्कॅटो. याचे फोटोज सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. त्याने टिपलेली छायाचित्रे पाहून ती केवळ छायाचित्रे नसून अर्थपूर्ण संदेश देणाऱ्या कलाकृती आहेत असं वाटत राहतं.
स्पेनच्या बार्सिलोनात जन्मलेल्या आणि नॉर्वेमध्ये वाढलेल्या पाऊने सुरुवातीला आर्किटेक्ट होण्याचा अभ्यास केला. पण नंतर त्याला असं लक्षात आलं की आपलं पॅशन हे लेन्स आणि त्यातून टिपल्या जाणाऱ्या छायाचित्रांमध्ये आहे. त्यामुळे २०१४ मध्ये त्याने आर्किटेक्चरला रामराम ठोकला आणि कॅमेऱ्यांची लेन्स हातात धरून तो आजूबाजूचे अद्भुत क्षण टिपू लागला! बार्सिलोनाच्या गल्लीबोळापासून ते लंडन आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यांपर्यंत सगळीकडचे क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याने काढलेले फोटो एकाचवेळी इतके चमत्कारी आणि अर्थपूर्ण होते की पाहणारा पाहतच बसे! जर तुम्हाला स्ट्रीट फोटोग्राफीची आवड असेल तर पाऊचे फोटो तुमच्या डोळ्यांना एक अद्भुत आणि मनोरंजक असा अनुभव देऊ शकतात!



















