सगळेच लोक काही सारखे नसतात. जिथं देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारे असतात, तिथेच स्वार्थासाठी फंदफितुरी करणारेही असणारच. आजवर तुम्ही देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या, स्वतःचे सर्वस्वावर पाणी सोडणाऱ्या गुप्तहेरांची कहाणी वाचली. पण आज अशा गुप्तहेराची गोष्ट आम्ही सांगणार आहोत ज्याने देशासोबत गद्दारी केली. या माणसाने काही पैशांसाठी देशाची महत्वपूर्ण माहिती विकली.
रबिंदर सिंग एक निवृत्त आर्मी अधिकारी होता. तिथे तो मेजरच्या हुद्द्यावर होता. त्याने स्वखुशीने रॉ (RAW)मध्ये काम मिळवले. तिथेही तो काही सिनियर एजंट्सपैकी तो एक होता. असं म्हणतात की १९९०मध्येच सीआयएच्या एका बाईने हा मासा गळाला लावला होता आणि तेव्हापासून तो भारताची गुप्त माहिती अमेरिकेला कळवत होता. त्याने तशी बरीच माहिती अमेरिकेला कळवली असावी. रॉचे बरेच अधिकारी त्याला रिपोर्ट करत. त्यातल्या कित्येकांना ही माहिती दुसऱ्या देशाकडे जात आहे हे ही माहित नव्ह्ते पण काहीजणांना याची कल्पना होती असं म्हणतात.







