कपूरथळ्याचा कामदेव या लेखात आपण अनिता डेलगॅडोची कथा वाचली असेल. आज आपण त्याच जगतसिंग महाराजांच्या दुसऱ्या युरोपियन राणीची गोष्ट वाचणार आहोत. ही राणी अनिता डेलगॅडो हुशार आणि व्यवहार चतुर नव्हती. या दुसऱ्या युरोपियन राणीचं नाव होतं युजीन ग्रासुपोवा. एका झेक उमरावाच्या आणि एका नटीच्या, नीना ग्रासुपोवाच्या संबंधातून जन्माला आलेली अनौरस संतती म्हणजे युजीन ग्रासुपोवा.
युजीन आणि महाराज जगतजितसिंग या दोघांची गाठ एका नाट्यगृहात झाली. युजीनची आई आणि आजी दोघीही व्यावसायिक रंगमंचावरच्या कलाकार होत्या. एकदा तारुण्य ओसरलं की पाठीराखे नाहीसे होतात, उत्पन्न संपतं याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे महाराजा जगतजीत सिंग यांनी जेव्हा युजीनला मागणी घातली तेव्हा महाराजांना प्रोत्साहन देऊन, युजीनचे मन वळवण्यात या दोघींचा हातभार होता. महाराज जगतजीतसिंग म्हणजे मदनाचा पुतळा नव्हता. पण त्यांच्या रुपात आपला तारणहार आला अहे याची खात्री आई आणि आजीला होती म्हणून फार वेळ न दवडता युजीनला महाराजांसोबत लग्नाला त्यांनी भरीस घातलं. पण प्रत्यक्ष विवाह होण्यासाठी मध्ये पाच वर्षं जावी लागली.










