काल अमावस्या होती. म्हणजे मराठी दिनदर्शिकेप्रमाणे ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस होता. आज आषाढाचा पहिला दिवस! वाङ्मय शास्त्राच्या रसिकांना आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण होते महाकवी कालिदास आणि त्याच्या मेघदूत काव्यातील "आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालां "या ओळीची! महाकवी कालीदास आणि त्याच्या अजरामर साहित्यकृतींविषयी आपण शाळेत असताना ऐकले वाचले असतेच. पण ही ओळ ज्या 'मेघदूत' या महाकाव्यात आहे त्या आणि रघुवंश, कुमारसंभव या काव्याचा जन्म कसा झाला यामागची एक रंजक कथा आज आपण वाचूया!
कालिदासाच्या मेघदूत, रघुवंश आणि कुमारसंभव या काव्यांमागची रंजक कथा!!


असं म्हणतात की कालिदास हा जन्माने फार बुध्दिमान नव्हता. तो एक अडाणी गुराखी होता. थोडासा मंदबुध्दी होता असे म्हटले तरी चालेल. तो ज्या नगराच्या परिसरात राहत असे त्या नगराच्या राजकन्येशी म्हणजे काव्योत्तमेशी कपटाने त्याचा विवाह लावून देण्यात आला. लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा अंधारात उंट ओरडायला लागले तेव्हा काव्योत्तमेने कालिदासाला विचारले, "हा आवाज कोणाचा?" त्यावर त्याने उत्तर दिले, 'उट्राचा'. संस्कृत भाषेत उंटाला 'उष्ट्र' म्हणतात. कालिदासाने उट्र असे उत्तर दिल्यावर राजकन्येला कळून चुकले की ती फसली आहे. रागाच्या भरात तिने आपल्या पतीला लाथा घालून घराबाहेर हाकलले. कालिदासाला हे कळले की आपण बुध्दिमान नसल्याने आपल्या पत्नीने अपमान करून घराबाहेर काढले आहे. या नंतरच्या कथेत कालिदास देवी कालीमातेची उपासना करतो आणि बुध्दिमत्ता मिळवतो. विद्वान होतो. आता त्याला परिस्थितीचे नव्याने भान आलेले असते. एकेकाळी मूर्ख आणि अडाणी असलेल कालिदास घरी परतून येतो आणि खरी कथा सुरु होते.

घरात प्रवेश करण्यासाठी दार ठोठावून म्हणतो, "कपाटम् उद्घाट्य सुन्दरि'. (हे सुंदरी दरवाजा उघड). काव्योत्तमा दरवाजा उघडून बघते तेव्हा तिच्या नजरेस कालिदास पडतो. ती रागाने विचारते, "अस्ति कश्चिद् वाग्विशेषः?" म्हणजे तुझ्याकडे बोलण्यासाठी काही विशेष आहे का?
या प्रश्नाने कालिदास व्यथित होतो. पण काव्योत्तमेने आपला अपमान केला नसता तर आपण मूढ-मूर्खच राहीलो असतो हे जाणून तिला तो गुरु मानतो. म्हणून भविष्यात कालिदासाने "अस्ति कश्चिद् वाग्विशेषः?" या प्रश्नाच्या प्रत्येक शब्दावर एकेका महाकाव्याची रचना केली.

त्या प्रश्नातला पहिला शब्द 'अस्ति'. या शब्दापासून 'कुमारसंभव' या काव्याची सुरुवात होते.
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥१॥
(कुमारसंभव )
(अर्थ: भारतवर्षाच्या उत्तरेला हिमालय नगाधिराज म्हणजे सर्वात मोठा पर्वत उभा आहे जो पूर्वेपासून आणि पश्चिमेच्या सागरापर्यंत पसरून भारतवर्षाचा जणू मापदंड असल्यासारखा आहे.)

दुसरा शब्द 'कश्चित'. या शब्दापासून 'मेघदूता'ची सुरुवात होते.
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत:
शापेनास्तग्ड:मितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु।।
(अर्थ: देवांच्या सेवेत कुचराई केलेल्या एका यक्षाला एक वर्षं घराबाहेर राहण्याची शिक्षा मिळाल्याने तो रामटेकच्या डोंगरावर राहतो आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी ढगांना बघितल्यावर त्या मेघाला तो आपला संदेश पत्नीपर्यंत नेण्याची विनंती करतो आहे. या काव्याची सुरुवात खाली दिलेल्या श्लोकाने झाली आहे.)

त्या प्रश्नाचा शेवटचा शब्द आहे वाक्. या शब्दाच्या संदर्भाने 'रघुवंश' या महाकाव्याची सुरुवात होते .
वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥1.1॥
(अर्थ: वाणी आणि अर्थ जसे एकमेकांना पूरक असतात तशी शिव-पार्वती आहेत त्यांना मी वंदन करतो.)
कालिदासाची अनेक काव्ये मनाला मोहून टाकणारी आहेत. त्याचा नंतर कधीतरी आपण आढावा घेणारच आहोत. पण आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो, आपण त्यांचे स्मरण करूया!!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१