आपले संस्थानिक अत्यंत ऐष आणि आरामात जगले. ब्रिटिशांच्या काळातल्या या संस्थानिकांच्या कहाण्या वाचल्या तर बरेचजण परदेशात शिकले, जगभर फिरले म्हणण्यापेक्षा ते तेव्हाच एनआ आय असल्यासारखे भारतात कमी आणि युरोपात जास्त राह्यले, भारतात राहूनही इथल्या मातीतले कमी आणि पोलो-बॅडमिंटनसारखे परदेशी खेळ जोपासत राहिले, परदेशी लोकांशी लग्नं केली. युरोपातल्या सर्वात महाग समजल्या जाणाऱ्या मोनॅको देशातही जाऊन काहीजण राह्यले.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका वैभवात जगलेल्या राजकन्येची गोष्ट सांगणार आहोत. का? सव्वाशे वर्षांपूर्वी राजघराण्याची बंधनं झुगारणारी, दुसऱ्यांनी आखून दिलेलं आयुष्य न जगता आपल्याला हवं तसं जगणारी, वैधव्य आलं तरी त्याचा बाऊ न करता उलट फॅशनचे धडे देणारी आणि हतबल-निराधार-अबला स्त्री अशा शब्दांनाही जवळ येऊ न देणारी मराठी राजकन्या विशेषच मानावी लागेल ना? आणि हो, या राजकन्येचा लहानपणीचा फोटो तुम्ही नक्की पाह्यलाय. कुठे?
शिकण्याची हौस असलेल्या पुण्याच्या बाहुली नावाच्या मुलीला काच घातलेला लाडू खायला घातल्यामुळे ती वारली ही फॉरवर्ड होऊन आलेली गोष्ट वाचली असेलच ना? त्या लेखासोबत येणारा फोटो त्या बाहुलीचा नाही, तो आहे आपल्या बडोदा संस्थानच्या राजकन्या इंदिरादेवींचा!! आज आपण त्यांचीच गोष्ट वाचणार आहोत.











