(राजेंद्र जक्कलच्या वडिलांचा स्वस्तिक फोटो स्टुडीओ)
दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह हे तिघेही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले होते. सुहास चांडक हा त्यातल्या त्यात साधन सुस्थितीत असलेल्या कुटुंबातून आला होता. जक्कलच्या बिनधास्त, बेछूट, वागण्याचा त्यांच्यावरती इतका प्रभाव होता की खुनासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या हातून घडले. जक्कल मात्र त्याच्या कॉलेजमध्ये गुंड म्हणून प्रसिद्ध होता. अरेरावी करणे, विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षकांना चाकूचा धाक दाखवणे, अशा अनेक रीतीने कॉलेजमध्ये दरारा निर्माण करणे हा त्याचा उद्देश होता. एका विशिष्ट वयात बंडखोरी करणे हा व्यक्तिमत्वाचा स्वाभाविक भाग असतो. बंडखोरीच्या व्यतिरिक्त दारू आणि इतर व्यसनांना सतत कमी पडणारा पैसा यासाठी दरोड्याचा मार्ग या सर्वांनी स्वीकारला.
आपल्या आयुष्यात आपल्याला कायम डावलले गेले आहे ही भावना जक्कलने त्यांच्या मनात पेरले. कदाचित यापैकी एकजण जरी वेळीच सावध झाला असता तर पुढचे अक्षम्य गुन्हे घडलेच नसते. राजेंद्र जक्कलच्या या व्यक्तिमत्वाचा उलगडा त्याचा जवळचा मित्र शाम भूतकर यांनी “चिन्ह” मासिकाच्या एका अंकात सविस्तर केला आहे. संदर्भासाठी हा पूर्ण लेख आम्ही सोबत देत आहोत. या संदर्भासाठी चिन्हचे संपादक सतीश नाईक यांचे विशेष आभार.
जक्कलचं व्यक्तिचित्रण या लेखाच्या अंतिम टप्प्यात आपण करणारच आहोत, पण त्याआधी हा खटला कसा चालला ते आपण बघूया. परिस्थितीजन्य पुरावा आणि काही साक्षीदार यांच्या जोरावर हा खटला चालवणे शक्य नसल्याने सुहास चांडकला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले. कोर्टात सुहास चांडकची साक्ष ऐकण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. याआधी बोभाटाच्या सीमा गावित प्रकरणात माफीचा साक्षीदार उभा करणे किती अपरिहार्य आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. त्यामुळे सुहास चांडक १० पैकी ७ खुनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असून उजळ माथ्याने बाहेर पडला. सुरुवातीला सेशन्स कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट या दोन्हीमध्ये खटला चालल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्याकडे केलेली अपिले देखील फेटाळण्यात आली. त्यानंतर २७ नोव्हेंबर १९८३ साली सर्व आरोपींना फासावर लटकाविण्यात आले.