हा प्रकार सुरू झाला सप्टेंबर १९७६ मध्ये. बेल्जीयममधील अँटवर्प नावाचं शहर. इथे प्रिन्स लिओपोल्ड इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन (आयटीएम) नावाची संशोधन संस्था आहे. सुमारे १०० वर्षं जुनी. तर त्या सप्टेंबरमध्ये एक दिवस या संस्थेच्या नावाने एक पार्सल आलं. तो होता एक गडद निळ्या रंगाचा थर्मास. त्याच्या आत बर्फ़ाचे काही तुकडे होते, ज्यांचं आता जवळपास पाणी झालं होतं. आणि याच पाण्यात तरंगत होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट - रक्त भरलेल्या छोट्या छोट्या डब्या. हे अजब पार्सल कुणी पाठवलं होतं? काय होती त्याची गोष्ट?
इबोला काय आहे? वाचा १९७६ साली सापडलेल्या या विषाणूचा आजवरचा प्रवास !!


हे पार्सल बेल्जीयममध्ये आलं होतं थेट आफ्रिकेतून. तेव्हा आफ्रिकेत झाईरे नावाचा देश होता. ज्याला आज काँगो या नावाने ओळखलं जातं तो हा देश. बेल्जीयममधल्या एका डॉक्टरचं पोस्टिंग त्यावेळी काँगोमध्ये होतं. एक नन त्याची पेशन्ट होती. तिला नक्की कोणता आजार झालाय हे काही केल्या त्या डॉक्टरला कळत नव्हतं. त्याला फक्त इतकंच माहिती होतं की असा आजार असलेले या देशात अजूनही काही लोक आहेत, नि त्यांच्यापैकी काही जण मरणही पावले आहेत. अखेर, तिचा आजार काय आहे हे तपासून पाहण्यासाठी त्याने तिचं ब्लड सॅम्पल बेल्जीयममध्ये असलेल्या आयटीएमकडे पाठवलं. तिथे शास्त्रज्ञांनी तो नमुना तपासणीसाठी सूक्ष्मदर्शकाखाली धरला तेव्हा त्यांना त्यात बल्बच्या फिलामेंटसारखा दिसणारा एक विषाणू दिसला. हा विषाणू काही वर्षांपूर्वी म्हणजे १९६८ मध्ये शोधल्या गेलेल्या मार्बर्ग विषाणूसारखा होता. त्याची गोष्टही आफ्रिकेशीच जोडलेली होती.

१९६७ मध्ये एके दिवशी युगांडा या देशातून निघालेली दोन जहाजं जर्मनीतल्या दोन शहरांत - फ्रँकफर्ट आणि मार्बर्ग येथे - पोहोचली. या जहाजांवर युगांडाची वानरं होती. वैद्यकीय संशोधनासाठी या वानरांचा उपयोग केला जाणार होता. पण या वानरांनी जर्मनीत पोहोचल्यावर हाहाकार माजवला. तिथे त्यांच्यावर काम करणारे संशोधक एका विचित्र आजाराला बळी पडू लागले. त्यात काही माणसं मेली. आता संशोधकांना जाणवलं - ही नव्या विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात आहे. हा नवा विषाणू मार्बर्ग शहरात सापडला म्हणून त्याचं नाव मार्बर्ग.

तर त्या निळ्या थर्मासमधल्या कुप्यांमधील रक्तातला विषाणूपण या मार्बर्ग विषाणूशी खूपसा मिळताजुळता होता. झाईरे मधल्या याम्बुकू गावात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. इथे लेपाला नामक नदी वाहते. या नदीचं अजून एक नाव आहे - इबोला. या नावावरून त्या विषाणूला नाव मिळालं - इबोला व्हायरस. या विषाणूची एक गंमत आहे. हा मधूनच प्रकट होतो. आपला रंग दाखवतो, आणि मग काही वर्षं चक्क सुप्तावस्थेत लपून राहतो. त्या काळात तो कुठे वस्ती करतो, कसा जगतो, त्याचा होस्ट कोण याविषयी नक्की माहिती अजूनही उपलब्ध नाही. एक मात्र खरं हा विषाणू असल्याने स्वतः काही तासांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही किंवा पुनरुत्पादन करू शकत नाही. त्याला त्याच्या अस्तित्वासाठी लागतं एक शरीर. मग भलेही ते एखाद्या प्राण्याचं असेल वा माणसाचं. इबोला हा फिलो व्हायरस समूहातला आहे. त्याच्या संसर्गामुळे मानवी शरीरात अंतर्गत रक्तस्राव होतो आणि याचा मृत्यू दर आहे जवळपास ५० ते ९० टक्के! हा विषाणू माणसांकडून माणसांकडे प्रसारित होतो. माणसाच्या शरीरातील फ्लूइड्स जसे घाम, मूत्र, थुंकी इतकंच काय वीर्यदेखील त्याच्या प्रसाराचं माध्यम बनू शकतं. संक्रमित माणसाच्या वस्तू वापरल्याने किंवा अशा रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या प्रेताच्या संपर्कात आल्यानेही रोग पसरल्याची उदाहरणं आहेत.

या इबोला विषाणूचा २०१४-१६ दरम्यानचा कहर आठवतोय? त्याची सुरुवात झाली आफ्रिकेतल्या गिनी या देशातून. इथे मिलियांदो नावाचं एक गाव आहे. या गावाबाहेर एक मोठं झाड होतं. त्याच्या ढोलीत वटवाघळांची वस्ती होती. गावातली मुलं कधीकधी इथे खेळायला यायची. खेळताना ढोलीत हात घालून वटवाघळं पण पकडायची. मग त्यांना लाकडाला बांधून विस्तवावर भाजून खाण्याचा कार्यक्रमपण चालत असे. एमिले हा त्याच गावातला छोटा मुलगा. गावातली मुलं कधीकधी त्यालाही खेळायला या झाडापाशी घेऊन यायची. एक दिवस असाच तो खेळून संध्याकाळी घरी गेला आणि आजारी पडला. अंग भट्टीइतकं तापलं. शेवटी गेलाच तो. काही दिवसात त्याच्या संपर्कात आलेले सगळेच एक एक करून गेले. गोष्ट इथेच संपत नाही.

या झाडावर मधमाश्यांचं एक पोळं होतं. गावातल्या एकाने मध मिळण्याच्या आशेने या पोळ्याला आग लावली, त्याचबरोबर ढोलीत राहणारी अनेक वटवाघळं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. भाजून निघाल्याने झाडावरून खाली पडलेली ती वटवाघळं म्हणजे गावकऱ्यांसाठी मेजवानीच! त्यांनी भराभर ती स्वतःच्या हाताने गोळा केली आणि झालं! दोन-तीन दिवसात हाहाकार उडाला. एमिले ला झालेला आजार आता गावात उग्र स्वरूप धारण करू लागला. घराघरातून प्रेतं उठू लागली. पाहता पाहता वटवाघळामुळे पसरलेल्या या आजाराने अख्खा गाव गिळंकृत केलं. ६० दिवसांच्या आत हा रोग संपूर्ण गिनी देशभर पसरला. हळूहळू संपूर्ण आफ्रिका खंड या महामारीने व्यापून टाकलं. या विषाणूने महाभयानक रूप धारण करत अल्पावधीत हाहाकार माजवला. हा उद्रेक २०१६ पर्यंत असाच चालू राहिला. मोठ्या प्रमाणावर माणसं मेली.
हे सगळं आता इथे मांडायचं कारण काय? तर सावधान! तो परत आलाय. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी इबोलाच्या नवीन केसेस आफ्रिकेत सापडल्याची नोंद झाली आहे. आधीच कोरोनाच्या विळख्यात जग सापडलेलं असताना आता ही नव्या संकटाची नांदी आहे. यातून निसर्ग आपल्याला काही सांगू इच्छित आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे. आपण सगळं काही मिळवलं, पण निसर्गावर विजय मिळवू शकलो नाही हेच खरं!
लेखिका: स्मिता जोगळेकर
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१