खेड्यातल्या शाळांची विशेषता म्हणजे तिथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते!! शिक्षक आणि विद्यार्थीच नाही, तर एकमेकांच्या घरचेही संबंध अगदी जवळचे झालेले असतात. एक मोठं कुटुंबच असल्यासारखे ते एकमेकांची काळजी घेणं, विचारपूस करणं हे अगदी सहजपणे करत असतात. शाळा संपली म्हणजे नाते संपले असे तिथे नसते. गावातल्या सणांमध्ये, तिथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये शिक्षकसुध्दा मनापासून सामील होत असतात. एक शिक्षक एकाच शाळेत १०-१२ वर्षं असल्यावर तर तो त्या गावाचाच सदस्य झालेला असतो. खेड्यांकडून शहराकडे जेव्हा विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढत आहे, अशा वातावरणात मनापासून विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या मोजक्या शिक्षकांमुळे खेड्यातले शिक्षण आजही आनंददायक आहे.
पण प्रत्येक शिक्षक असा असेल असे नसते राव!! शिक्षक येणे आणि काही दिवस राहून त्याची बदली होणे यातही काही नविन नाही. पण काही शिक्षक मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर एवढे गारुड करतात की त्यांची बदली झाली तर ते विद्यार्थ्यांना सहन होत नाही.






