पण, आता जिम्नॅस्टिक्स हा खेळ चर्चेत आला आहे तो मिली सरकार या १७ वर्षाच्या तरुणीमुळे. पश्चिम बंगालच्या रायगंज गावातील मिली सरकार ही एक उत्तम जिम्नॅस्टिकपट्टू आहे. मिलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून नेहमीच ती जिम्नॅस्टिक्सचे व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडीओत असे नेमके काय आहे, ज्यामुळे मिली सरकार समस्त नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली?
मिलीने यावेळी ब्लॅकफ्लिपचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे ब्लॅकफ्लिप करताना तिने साडी नेसली आहे. आता तुम्हीच कल्पना करा ब्लॅकफ्लिप आणि तेही साडीत! करवते तरी का ही कल्पना आपल्याला? नाही ना! पण, मिलीने हे वास्तवात करून दाखवले आहे. साडीतही तिने इतक्या सफाईदारपणे हे ब्लॅकफ्लिप्स केले आहेत की, पाहणाऱ्याचे डोळे विस्फारले जातील.
साडी घातल्यानंतर अनेकींचा चालतानाही किती गोंधळ उडतो. तिथे जिम्नॅस्टिक्स करण्याची कल्पनाही कुणी करणार नाही. पण, मिलीने ही कल्पना केली आणि ती प्रत्यक्षात उतरवूनही दाखवली. मिलीचा हा व्हिडीओ दहा लाखपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवरही लाखो लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.
खरे तर ही तरुण नर्तिका नेटकऱ्यासाठी अगदीच अपरिचित आहे असे नाही. तिच्या वीगो अकाऊंटवर तिचे सात लाख फॉलोअर्स आहेत. तिने टीकटॉकवर देखील आपली कला दाखवलेली आहे. टिकटॉकवरही तिचे तितकेच फॉलोअर्स आहेत. परंतु सध्या भारतात या दोन्ही अॅप्सवर बंदी आलेली असल्याने तिने अलीकडेच इन्स्टा अकाऊंट सुरु केले आहे आणि इथेही तिला जबरदस्त फॅनफॉलोइंग मिळाली आहे.
तिच्या या अनोख्या प्रयोगाची कल्पना तिला कशी सुचली, असे विचारले असता मिली सांगते, “तसा साडीत वावरण्याचा मला जास्त अनुभव नाही. पण, ही कल्पना अगदीच वेगळी वाटली म्हणून हा प्रयोग करून पाहिला. खरे तर मला माझ्या बहिणीने हे सुचवलं.” हे सांगताना मिलीच्या चेहऱ्यावरील हास्य लपता लपत नाही.
मिलीला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. गेल्या पाच वर्षातच तिला तिच्या नृत्याचे व्हिडीओ शूट करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचा मार्ग सापडला. यात तिची मोठी बहिण शिवलीची ही तिला खूप मदत झाली.
तिने केलेले हे छोटे-छोटे व्हिडीओ एडीट कसे करायचे आणि ते अपलोड कसे करायचे हेही तिचे तीच शिकली. सुरुवातीला ती व्हिगो या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करायची. तिथे तिच्या व्हिडीओना प्रचंड प्रतिसाद मिळत असे. ज्यामुळे मिलीला प्रोत्साहन मिळत गेले आणि ती यात अधिकाधिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी नियमित सराव करू लागली.
नेटवर काय चालेल आणि काय नाही याची नस टीनएजर्सना तरी लगेच सापडते. मिलीलाही नेटकऱ्यांची नस अचूक सापडली. तिचे योगा आणि जिम्नॅस्टिक्सच्या व्हिडीओना जास्त प्रसिद्धी मिळते हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने याच दोन गोष्टींवर विशेष भर दिला. तिच्या घरच्यांनीही तिला या दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिचे यातील कौशल्य वाढवण्यासाठी तिचे बाबा स्वतः तिचा सराव करुवून घेऊ लागले. मिलीचे कुटुंब हे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत आणि आई गृहिणी. तिच्या वडिलांनाही योगासनांची आवड आहे. त्यांनी स्वतः आवर्जून हा छंद जोपासला आहे. मिलीला एक मोठा भाऊ आहे, जो सध्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी छोटी-मोठी कामे करतो. असे हे एक सर्वसाधारण कुटुंब.
योगा शिकण्यासाठी मिलीने खास क्लास लावला होता. पण, पैशाच्या अडचणींमुळे तिला हा क्लास अर्ध्यातच सोडवा लागला. व्हिगो वरून तिला प्रसिद्धी मिळाल्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यक्रमांसाठी बोलावले जाऊ लागले. यातून जी काही थोडी बहुत कमाई तिला झाली त्यातून तिने एक चांगला फोन विकत घेतला. जेणेकरून तिला अधिक चांगले व्हिडीओ शूट करता येतील. शिवाय, व्हिडीओसाठी चांगले फॅशनेबल ड्रेस, मेकअपसाठी आवश्यक साधने अशाही गोष्टींची जमवाजमव करणे शक्य झाले. तिने स्वतःचे एक युट्युब चनेल सुरु केले आहे ज्यावरून ती व्हिडीओ प्रसिद्ध करत असते. या चनेलवर ती विशेष करून तिच्या नृत्याचे व्हिडीओ अपलोड करते.