लॉकडाऊन शिथिल झाला आहे, पण करोनाची भीती अजूनही संपलेली नाही. जीव मुठीत धरुन बरेचजण आपल्या कामावर रुजू झाले आहेत. पण.. येणार्या दिवसाची काहीच खात्री नाही! अचानक येणार्या आजारपणाने हॉस्पीटलमध्ये दाखल करणे अनिवार्य झाल्यास होणार्या खर्चांनी आधीच खिळखिळी झालेली घराची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते. हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह खात्याने सर्व नोकरदारांचा सामूहिक आरोग्य विमा घेणे अनिवार्य केले आहे.
बर्याच उद्योग आस्थापनांकडे एम्प्लॉयीज स्टेट इन्शुरन्स स्किम लागू आहेच, पण त्या योजनेखाली येणार्या सदस्यांच्या पगारावर त्यांना योजनेत सामिल होता येईल अथवा नाही हे ठरवले जाते. याबाबत अनेक सरकारकडे अनेक अर्जविनंतीद्वारा चर्चा चालू आहेत. त्यावर स्पष्ट भूमिका थोड्याच दिवसांत समोर येईल. पण आमच्या आजच्या लेखाचा विषय तो नसून जर सामूहिक आरोग्य विमा घेण्याची चर्चा आपल्या आस्थापनात म्हणजेच कंपनीत चालू असेल तर ती विमा योजना स्विकारण्यापूर्वी त्यात असलेल्या अनेक खाचाखोचा समजून घेणे हा आहे.














