वाराणसी म्हटल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय आठवतं? हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ, विश्वेश्वर मंदिर, पवित्र गंगा नदी, इथले अनेक घाट आणि छोटी-छोटी मंदिरे. अगदी दररोज या शहराला हजारो नव्हे, लाखो भाविक भेट देत असतील. कुठल्याही काळात या शहरातील भक्तांची, पर्यटकांची गर्दी कमी होत नाही. हिंदू धर्मात तर या शहराला अनन्य साधारण महत्त्व आहेच, पण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात या शहरात अखंड भारताची एक वेगळी प्रेरणा निर्माण झाली होती. जिथे हिंदू देवदेवतांची असंख्य छोटी छोटी मंदिरे आहेत, त्याच वाराणशी शहरात एक भारत माता मंदिरही आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती असेल.
भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लाखो लोकांनी जमेल त्या मार्गाने लढा दिला. कुणी अहिंसेच्या मार्गाने, तर कुणी संघर्षाच्या. पण प्रत्येकाच्या मनात भारत मातेची एक मूर्ती कोरली होती. "फोडा आणि राज्य करा" या ब्रिटिशांच्या कपटनीतीला भीक न घालता भारतीयांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले. या अखंड भारतात फक्त पाकिस्तान आणि भारत यांचाच समावेश नव्हता, तर यात भारतीय उपखंडातील आणखी दोन-तीन देशांचा समावेश होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांसाठी भारतमाता हीच त्यांची खरी देवता होती. आपल्या या देवतेप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम दाखवण्यासाठी त्यांनी भारत माता मंदिर उभारण्याचे ठरवले. स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी यांना पहिल्यांदा ही कल्पना सुचली. महात्मा गांधींनी त्यांच्या या कल्पनेचे समर्थन केले. वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या परिसरात हे मंदिर उभारण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यापिठाचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसैनिक बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी विद्यापीठाच्या परिसरात मंदिर उभारण्याची तयारी दाखवली.






