एकही चूक नसलेला गुन्हा (परफेक्ट क्राईम) कधीच होऊ शकत नाही असे म्हणतात. पण आज आम्ही एका अशाच घटनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हा गुन्हा घडलाय जपानमध्ये. आज या घटनेला ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय तरी हा गुन्हेगार सापडला नाही. आता तो कदाचित कधीच सापडणार नाही. तर काय घडलं होतं ते समजावून घ्यायला आपण जाऊया १९६८ सालाच्या जपानमध्ये.
डिसेंबर १०, १९६८ निहोन शिन्ताकू गिन्को बँकेचे मॅनेजर भरपूर चिंतेत होते. त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना कुणीतरी धमकावत होते. त्यांच्या घरी एक पत्र आलं होत. पत्रात लिहिले होते की जर ३०० मिलियन येन मिळाले नाहीत तर मॅनेजर साहेबांचे घर उडवून देण्यात येईल. हे पत्र हाताने लिहिलं नव्हतं, तर पेपर आणि मासिकांमधून एक-एक अक्षर कापून ते तयार करण्यात आलं होते. अर्थातच पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी बँकेवर आणि मॅनेजरच्या घरावर पाळत ठेवायला सुरुवात केली.









