१९९७ साली एक बुकस्टोर म्हणून सुरू झालेली कंपनी आज ई-कॉमर्स क्षेत्रात जगातील सर्वात दिग्गज कंपनी झाली आहे. या कंपनीचा सीईओ आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ही गोष्ट अमेझॉनची आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. २४ वर्षे या कंपनीला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे जेफ बेझॉस यांनी कंपनीचे सीईओपद सोडले आहे. जगभर या गोष्टीची तुफान चर्चा रंगली. पण त्याहीपेक्षा जास्त चर्च होती ती अमेझॉनच्या नव्या सीईओची. अमेझॉन कोण सांभाळणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते.
अँडी जेस्सी हे आता अमेझॉनचे नवे सीईओ असणार आहेत. आजवर ते अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे चीफ म्हणून काम पाहत होते. अमेझॉनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते याच कंपनीत आहेत. जेफ बेझॉस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शेवटचे पत्र लिहिले, त्यात त्यांनी जेस्सी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बेझॉस यांच्यामते जस्सी हे कंपनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. जेस्सी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बेझॉस यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाते. बेझॉस यांच्या कार्य काळात अमेझॉनमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व निर्णयांमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप असायचा.







