चहाड्या करणं लोकांना का आवडतं? जाणून घ्या शास्त्र काय म्हणतं...

लिस्टिकल
चहाड्या करणं लोकांना का आवडतं? जाणून घ्या शास्त्र काय म्हणतं...

बऱ्याच वेळा एखाद्या मित्र येऊन हळूच कानात कुजबुजतो, "अरे, तू ऐकलंस का?" आणि तिथून सुरू होतात त्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दलच्या मीठ-मसाला लावलेल्या खुसखुशीत गप्पा. मग आपणही त्याच गोष्टी थोडा अधिक मसाला टाकून पुढे फॉरवर्ड करण्याचं काम इमानेइतबारे करतो. हे चक्र पुढे असंच चालत राहातं. या चहाड्या किंवा चुगली करण्याच्या प्रकारालाच थोडं चांगलं नाव मिळालंय- गॉसिपिंग. आणि हे गॉसिपिंग करायला गल्लीतल्या आज्या-काकवांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला भलतंच आवडत असतं. फक्त ते स्वतःबद्दल होऊ नये इतकीच इच्छा असते! पण हे गॉसिपिंग म्हणजे नेमकं काय? आणि ते करावं अशी ऊर्मी लोकांमध्ये का येते?

एखाद्याबद्दल नकारात्मक, वाईट गोष्टी बोलणं किंवा त्या पसरवणं, यालाच आपल्यात चहाडी करणं म्हटलं जातं. पण संशोधकांनी याची व्याख्या "एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा करणं किंवा त्याच्याबद्दल एखादी वैयक्तिक माहिती पसरवणं" अशी केलीय. गॉसिपिंगची सुरुवात अगदी प्राचीन काळापासूनच झाली आहे. आदिमानवांनी गुहांमधल्या भिंतींवर कोरलेली रेखाचित्रं हे या गॉसिपिंगचंच उदाहरण आहे.

बोलण्याची कला अवगत नसल्याने, इतरांना माहिती देण्यासाठी, किंवा घडणाऱ्या गोष्टी नोंद करून ठेवण्यासाठी ते भिंतींवर चित्रे कोरायचे. मानवी वर्तणूकीचे अभ्यासक फ्रॅन्क मॅकॲन्ड्र्यू सांगतात की प्राचीन काळातल्या आपल्या पूर्वजांनाही इतर यशस्वी लोकांच्या जीवनाबद्दल आकर्षण वाटायचं. पाषाण युगातला गुहेत राहणारा मानव स्वतः यशस्वी होण्यासाठी, कोण कोणासोबत झोपतं, कोणाकडे अधिक ताकद आहे, कोणाकडे जास्त संसाधनं आहेत, अशा इतरांच्या अनेक गोष्टींमध्ये रस ठेवायचा. उत्क्रांतवादी मानसशास्त्रज्ञ रॉबीन डन्बरच्या मते अगदी चिपांझी, गोरिल्ला यासारख्या उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्राण्यांमध्येही गॉसिपिंग हेच त्यांच्यात जवळीक निर्माण होण्याचं कारण असतं. "अशा सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्नांची चर्चा केल्याशिवाय आपण आपली समाजव्यवस्था टिकवू शकत नाही." असं डन्बर सांगतात.

'सोशल सायकॉलॉजीकल ॲन्ड पर्सनॅलीटी सायन्स' या जर्नलने प्रकाशित केलेल्या एका निरिक्षणात सांगितलंय की एक व्यक्ती एका दिवसात एकूण सरासरी ५२ मिनिटं गॉसिपिंग करण्यात घालवते. यात आपण जवळपास ४६७ विषयांवर बोलून जातो. या ५२ मिनिटांपैकी १५% चर्चा ही नकारात्मक असते. तर ७५% चर्चा ही अगदीच सामान्य, दैनंदिन स्वरूपाची, किंवा कंटाळवाणी असते. उदाहरणार्थ, "काल तो कामाच्या ठिकाणी उशिरापर्यंत अडकला होता." अर्थातच या गॉसिपिंगमध्ये सकारात्मक गोष्टी या अगदीच कमी, म्हणजे फक्त ९% असतात. मानसशास्त्रीय प्रतिक्रियांच्या अभ्यासातून दिसून येतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समाजविरोधी कृत्याबद्दल, किंवा अन्यायाबद्दल ऐकतो, तेव्हा आपल्या ह्रदयाचे ठोके हे वाढतात. पण जेव्हा आपण एखाद्याबद्दल सक्रियपणे बोलतो तेव्हा आपल्याला शांतता मिळते आणि आपल्या ह्रदयाचे ठोकेही मंदगतीने चालतात. याचाच अर्थ आपण एखाद्या विषयावर सक्रीयपणे चर्चा करण्यास जास्त प्राधान्य देतो.

आपल्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल गॉसिप करणं एकवेळ समजू शकतो. पण जे आपल्याला भेटलेच नाहीत आणि भेटणारही नाहीत अशा सेलिब्रिटींबद्दलही आपण गॉसिपिंग करतो. आज मिडीया, इंटरनेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला भरपूर माहिती ऐकायला आणि पाहायला मिळते. त्यामुळे ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचा आहे असा संदेश मेंदूला मिळतो. म्हणूनच लोक आपल्याच वयोगटातल्या सेलिब्रिटींबद्दल जास्त चर्चा करतात, त्यांचं अनुकरण करतात. पण आपला त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्यानं स्वतःच्या जीवनाची त्यांच्या आयुष्याशी तुलना करणं, स्वतःला कमी लेखणं, त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी घातक ठरतात.

गॉसिपिंगच्या माध्यमातून जेव्हा आपण एखादी माहिती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. ही अर्थातच दोघांमधल्या नात्यासाठी सकारात्मक बाब असते. याच‌ गॉसिपींगमुळे मैत्रीसंबंध निर्माण होण्यास मदत होते, आपल्या सामाजिक जीवनाला आकार देण्यासाठी गॉसिपींगमधून आलेल्या माहितीचा आधार घेतला जातो. वयोवृद्ध व्यक्तींना एकटेपणा घालवण्यासाठी गॉसिपिंग उपयुक्त ठरतं.

पण शास्त्रज्ञ सांगतात की कोणत्याही प्रकारचं सामाजिक शिकवण न देणारं गॉसिपिंग हे हानिकारक असतं. म्हणजे पाहा, एखाद्याच्या दिसण्यावर टोमणे मारणं किंवा खोट्या गोष्टी पसरवणं हे वाईटच की हो. एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितल्यानं ऐकणाऱ्याच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, सांगणाऱ्याचा उद्देश त्या तिसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब करणं, हाही असू शकतो.

गॉसिपिंग लोकांमध्ये नैतिक सुधारणा घडवून आणत असतं. म्हणजे समजा एखादा समूह आळशी किंवा कामचुकार व्यक्तींबद्दल गप्पा मारतोय, तर त्या समुहातील जे आळशी व्यक्ती आळशी आहेत, त्यांना त्यांची वर्तणूक सुधारण्यास मदत होते. कधीकधी नवख्या जागी गॉसिपींगमुळे माहित नसलेले‌ अलिखत नियमही माहित होतात. व्यक्तींवर केलेली चर्चा ही गोष्टी लोकांना चागलं वागण्यास प्रवृत्त करत असते, पण त्याचवेळी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. हे गॉसिपिंग सकारात्मक बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

पाह्यलंत, साध्यासोप्या गॉसिपिंगमध्ये एवढं काय दडलं होतं असं कधी वाटलं होतं का तुम्हांला?

टॅग्स:

scienceBobhata

संबंधित लेख