लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुखद बातमी यायचे काय नाव घेत नाहीये. पण ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे. आता नवीन कार किंवा बाईक विकत घेणे स्वस्त होणार आहे. भारतातली इन्शुरन्स नियमक संस्था- इरडा या संस्थेने लॉंग टर्म पॅकेज्ड थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज पॉलिसी नियम मागे घेतले आहेत. या नियमांनुसार कारसाठी ३ वर्षांचा आणि दुचाकीसाठी ५ वर्षांचा थर्ड पार्टी कव्हर घेणे अनिवार्य करण्यात आले होते. यामुळे कार किंवा बाईक विकत घेत असताना वाहनाची किंमत वाढत असे. लॉकडाऊनमुळे सगळ्याच गोष्टींची खरेदी बंद आहे. त्यात कार आणि बाईकचाही समावेश आहेच. या खरेदीला पुन्हा चालना मिळावी या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इरडाच्या साईटवर या संबंधी माहिती देण्यात आली आहे. लॉंग टर्म पॅकेज्ड प्रॉडक्ट हटविण्याचा निर्णय लवकरच अंमलात येईल असे त्यात म्हटले आहे. हा नियम २०१८ पासून सुरू करण्यात आला होता. त्यावेळी १ लाख ८० हजार पैकी फक्त ६० हजार वाहन इन्शुरन्स होते.







