मंडळी, एक धक्कादायक बातमी आली आहे. १ जानेवारी २०१९ पासून काही ATM कार्ड्स/क्रेडीट कार्ड्स काम करणं बंद करतील, पण घाबरू नका चांगली बातमी पण आहे. तुम्ही बँकेत जाऊन नवीन कार्ड घेऊ शकता. चला तर समजून घेऊया ATM कार्ड्स/क्रेडीट कार्ड बंद का पडणार आहेत आणि बंद पडलेच तर ते बदलून कसे घ्यायचे.

मंडळी, रिझर्व बँकेच्या आदेशानुसार मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले सर्व कार्ड्स आता ब्लॉक केले जातील तर त्यांची जागा EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि विझा) चीप असलेले नवे कार्ड्स घेतील. रिझर्व बँकेने याबद्दल २७ ऑगस्ट, २०१५ रोजी आदेश दिला होता. १ सप्टेंबर, २०१५ पासून जारी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्ड मध्ये मग तो डेबिट, क्रेडीट असो वा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्ड असो EMV तंत्रज्ञान असणे बंधनकारक आहे. जुने मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड चलनातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ३ पेक्षा जास्त वर्षांची मुदत देण्यात आली होती. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी ही मुदत संपणार आहे.
२०१५ ला आदेश मिळाल्यानंतर EMV तंत्रज्ञान असलेले नवीन कार्ड्स जारी करण्यात आले होते. आज बहुतेक सगळ्यांकडे EMV तंत्रज्ञान असलेले कार्ड्स आहेत, पण मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड्स पूर्णपणे बाद झालेले नाहीत.




