आपल्याकडे काही वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांमध्ये वाढ झाली आहे, पण स्वच्छतेच्या बाबतीत अजून पण आपण मागेच आहोत. पब्लिक टॉयलेटमधला वास, तिथली अस्वच्छता टाळण्यासाठी अनेकजण कमी पाणी पितात जेणेकरून शौचास जावं लागू नये. खास करून महिलांना ही समस्या त्रासदायक ठरते. ठाण्यात सुरु झालेल्या नवीन प्रयोगामुळे कदाचित हे चित्र बदलेल.
महिलांच्या समस्या ओळखून ‘लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि’ या संस्थेने ‘लू-‘वुमन्स पावडर रूम’ नावाचा नवीन प्रयोग हाती घेतला आहे. या संस्थेच्या शिवकला मुदलियार आणि मनीषा केळशीकर यांनी मिळून ठाण्यात WOLOO (Woman's Loo) सुरु केलं आहे. तसं बघायला हे महिलांसाठीचं सार्वजनिक प्रसाधन गृह आहे, पण इथे स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलंय.








