पंतप्रधान होण्यापूर्वी राजीव गांधी एखाद्या सर्वसाधारण नागरिकासारखे राहत होते. सुरक्षा पथकाच्या निगराणीखाली आयुष्य काढायची त्यांना सवयच नव्हती. ते ज्या घटनेमुळे पंतप्रधानपदावर आले ती घटना म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची, म्हणजे त्यांच्या आईची, अंगरक्षकांनी केलेली हत्या! साहजिकच राजीव गांधी यांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक काळजी घेणे अत्यावश्यक होते. ज्याला आपण एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) म्हणतो त्या दलाची निर्मिती यानंतरच झाली. राजीव गांधींना मात्र ही सुरक्षा म्हणजे डोकेदुखी वाटायची आणि त्या सुरक्षेला कंटाळून जायचे. बर्याच वेळा राजीव गांधी यांना सर्वसामान्य नागरिकासारखे फिरायची लहर आली की सुरक्षा दलाच्या नकळत ते घराबाह्रेर पडायचे आणि मोठ्ठाच गोंधळ निर्माण व्हायचा. त्यांचे असे वागणे सुरक्षा दलाच्या पोटात गोळा उभा करायचे.
त्यावेळी केंद्रीय गृह खात्याचे मुख्य सचिव श्री राम प्रधान होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी My years with Rajiv and Sonia हे पुस्तक लिहिले. राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त त्याच पुस्तकातून घेतलेल्या दोन कथा आज आम्ही सांगणार आहोत .







