आज आपण एका अशा मुलीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यात एक खास सुपरपॉवर आहे. अशी सुपरपॉवर तुम्ही सिनेमांमध्ये नक्कीच बघितली नसणार. ‘नताशा डेम्किना’ नावाच्या मुलीला जन्मतःच एक्स-रे असलेले डोळे मिळाले आहेत. मस्करी नाही भाऊ. नताशाबद्दल जाणून घेऊया, मग तुम्हीच ठरवा हे खरं आहे की खोटं.
डोळ्यात एक्स-रे आहे असा दावा करणारी मुलगी....तिने सांगितलेल्या गोष्टी किती खऱ्या होत्या ??


रशियातील सरांस्क येथे १९८७ साली नताशाचा जन्म झाला. ती १० वर्षाची असताना तिला तिच्या डोळ्यातील वेगळेपणाचा शोध लागला. काही मिनिटाच्या कटाक्षाने ती मानवी शरीरातील अवयव स्पष्ट बघू शकते असा तिचा दावा आहे. तिच्या या वेगळेपणामुळे तिला शरीरातील रोग ओळखता येतात. २००३ आणि २००४ पर्यंत तिने काही लोकांच्या शरीरातील रोगाचं निदान पण केलं होतं. तिने ज्या लोकांचं स्कॅनिंग केलं त्यांनी म्हटलंय की तिने सांगितलेले बारकावे डॉक्टर आणि स्कॅनिंग पेक्षा जास्त अचूक होते. काहींनी तर म्हटलंय की ज्या रोगाबद्दल त्यांना माहित नव्हतं त्याबद्दल पण तिने अचूक सांगितलं.

नताशा स्वतः बद्दल म्हणते की “माझ्याकडे २ प्रकारच्या दृष्टी आहेत. मी कोणत्याही क्षणी त्यांना बदलू शकते”. ती पुढे म्हणाली की “मला याचा त्रास होत नाही. मी फक्त विचार करून डोळ्यांची दृष्टी बदलू शकते.”
मंडळी, म्हणजे एक दृष्टी सामान्य माणसाची आणि दुसरी आपण ज्याला सुपरपॉवर म्हणतो तशी आहे. तिने म्हटलंय की शरीराच्या ज्या भागात रोग असतो तिथून एक विशिष्ट रेडीयेशन निघत असतं. यावरून ती रोगाचं निदान करते.

राव, या गोष्टीत एक फिल्मी ट्विस्ट पण आहे. नताशा स्वतः चं स्कॅनिंग करू शकत नाही आणि तिला रात्री स्कॅनिंग करता येत नाही.
ही गोष्ट आहे २००३ नंतर ची. नताशाला त्याकाळी भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. मिडियाने तिला डोक्यावर उचलून धरलं होतं. एवढंच नाही तर डिस्कव्हरी सारख्या मोठ्या चॅनेलने नताशावर संशोधन करण्यासाठी पैसा ओतला होता.
डिस्कव्हरी चॅनेलचं संशोधन
मंडळी, अशा असामान्य गोष्टींच्या दाव्यांचा तपास करण्याकरिता Committee for Skeptical Inquiry (CSICOP) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था काम करते. मार्च २००४ साली डिस्कव्हरी आणि CSICOP ने मिळून नताशावर संशोधन केलं होतं.
संशोधन अगदी सोप्पं होतं. नताशाला ७ लोकांचं स्कॅनिंग करायचं होतं. या ७ पैकी ६ जणांच्या शरीरात काही ना काही बिघाड होते तर त्यातला एकजण निरोगी होता. नताशाला या ६ जणांच्या शरीरातील निदान ४ गोष्टींच अचूक निरीक्षण सांगायचं होतं.

या ६ जणांमध्ये काहींचे अपेंडीक्स काढण्यात आले होते तर एकाच्या छातीवर सर्जरीसाठी वापरण्यात येणारं स्टेपल (तार) होतं. दुसऱ्या एका माणसाच्या कवटीचा भाग काढून टाकला असल्याने तिथे धातूची प्लेट लावण्यात आली होती. इतरांच्या शरीरातही असेच काहीसे बदल होते.
संशोधनाच्या वेळी नताशाला तिने निरीक्षण केलेल्या गोष्टी लिहून काढण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे तिने गोष्टी लिहून काढल्या. संशोधनाचा निकाल फारसा समाधानकारक नव्हता.

नताशाने काही गोष्टी बरोबर ओळखल्या, पण तिने काही व्यक्तींच्या बाबतीत संशयास्पद चूक केली. ज्या व्यक्तीच्या अपेंडीक्सचं ऑपरेशन झालं होतं, त्याला पाहताना ती म्हणाली की याच्या कवटीचा भाग काढून टाकण्यात आला आहे. माहितीच्या अफरातफरीमुळे तिच्यावर संशय घेण्यात आला.
याखेरीज आणखी एक गोष्ट लक्षात आली. ती अशी की संशोधनाच्या वेळी दिलेल्या वेळेच्या फार पूर्वीच ती आणि तिची आई तिथे हजर झाल्या होत्या. सोबत तिचा एक मित्र पण होता. आल्या आल्या त्यांनी त्या दोघांशी बोलायला सुरुवात केली. यावेळेत ते सतत एकमेकांना इशारे करत होते. याखेरीज संशयास्पद बाब म्हणजे तिचा असा दावा होता की ती काही मिनिटात डोळ्यांनी स्कॅन करू शकते, पण तिला तब्बल ४ तासांचा वेळ लागला.

डिस्कव्हरीच्या संशोधनानंतर ब्रिटनच्या ‘The Sun’ या वृत्तपत्राने एक स्वतंत्र तपास केला. या तपासात ‘The Sun’ने तिने सांगितलेल्या गोष्टी पुरेशा समाधानकारक आहेत असं सांगितलं होतं. ब्रिओनी वॉडन या महिला पत्रकारांचा अपघात झाला होता. नताशाने त्यांच्याबद्दल अचूक गोष्टी सांगितल्या होत्या. पुढे जपान मध्ये झालेल्या तपासणीचे निकाल पण समाधानकारक होते.

ती सध्या काय करते ?
नताशा २००४ नंतर प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिच्या घरासमोर लोकांची रांग लागली होती. तिच्या भेटीसाठी लोक पैसे देखील द्यायला तयार होते. स्थानिक वृत्तपत्रांपासून ते आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांपर्यंत तिच्यावर भरभरून लिहिलं. काही लेख वाचून मात्र तिच्या वडिलांना दुःख झालं कारण त्या लेखांमध्ये तिच्यावर टीका करण्यात आली होती.
तिच्याबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तिने त्यानंतर वैद्यकशास्त्रात प्रवेश घेतला. तिने २००८ साली मॉस्को येथील Special Diagnostic Center of Natalya Demkina हॉस्पिटलसाठी काम केलं. ती आता काय करते याबद्दल कोणालाच माहित नाही. तिचा आणि जगाचा संबंध तुटला आहे.
तर मंडळी, नताशाने जे दावे केले होते ते खरे आहेत की खोटे हे आजवर न उलगडलेलं रहस्य आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा !!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१