एडवीन ड्रेक नावाच्या एका माणसानं १८५९ साली तेलाच्या पहिल्या विहिरीतून कच्चे तेल उपसले आणि पेट्रोलियमच्या युगात आपण पाऊल टाकले. आपण ज्याला 'हायड्रोकार्बन सोसायटी ' म्हणतो त्या समाजव्यवस्थेचा जन्म झाला.नंतरच्या काळात हे काळे सोने शोधायची एक जबरदस्त स्पर्धा सुरु झाली आणि १९३८ साली मध्यपूर्वेतल्या अपरंपार साठ्याचा शोध लागला. तेव्हापासून आजपर्यंत एखाद्या अब्जाधीशाच्या अय्याश आणि बेताल पोरानी बापाची संपत्ती उधळावी त्याच थाटात आपण पेट्रोलियमचे साठे वापरतो आहोत. एकेकाली मोटरगाड्यांची संख्या काही हजारात होती.२०४० पर्यंत पृथ्वीवर २०० कोटी गाड्या असतील.आता आपल्या माहितीत असलेला तेलाचा साठा जेमतेन ४७ वर्षे पुरेल इतकाच आहे. ग्रामीण भाषेत एक म्हण आहे 'आगोट आली तोंडावर आणि कवट आलं **' म्हणजे पावसाळ्याची चाहूल लागली आणि कावळीची अंडं देण्याची वेळ आली की कावळा घरटं बांधायला घेतो. आपलं पण तसंच झालं आहे. तेलाचा साठा संपतो आहे-प्रदूषण हाताबाहेर जातंय आणि आपण पर्यायी उर्जा शोधतो आहे.
आता पर्यायी उर्जा कुठेतरी जमा करून ठेवलीय आणि फक्त तारा जोडल्या की झालं काम सुरु असं काही नसतंय. पर्यायी उर्जेचे स्त्रोत अनेक असतील पण ती उर्जा अखंडीत मिळायला हवी.अखंडीत मिळत नसेल तर ती साठवून ठेवण्याचे मार्ग तयार हवेत.हे सगळं परवडणार्या किंमतीत बसायला हवं.आतापर्यंत आपण किंमत मोजत होतो.आता किंमत नाही तर 'मूल्य' मोजूनच नवा रस्ता शोधावा लागणार आहे. आतापर्यंत उर्जेच्या प्रत्येक नव्या रस्त्यावर आपण पर्यावरणाचा बळी देत आलो. साहजिकच ती मर्यादा ओलांडल्यावर पर्यावरण आपला बळी देणार आहे हे लक्षात आल्यावर खडबडून जाग आली आणि 'ग्रीन अँड क्लिन एनर्जी'चा शोध सुरु झाला.








