मानवी जीवन अनेक आश्चर्यांचा समुदाय आहे. माणूस जसा विचार करायला लागला तसा त्याचा मेंदू अधिकाधिक विकसित होऊ लागला असं म्हणतात. मानवांच्या उत्क्रांतीमधला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मानवाच्या जन्माच्या प्रक्रियेपासून त्याची शारिरीक वाढ, त्याच्या बुद्धीचा झालेला विकास आणि त्यातून त्याने साध्य केलेली तांत्रिक प्रगती, या मागील कार्यकारणभाव समजून घेण्यास जितका कठीण तितकेच कठीण आणि गूढ आहेत मानवाचे क्रियाव्यापार.
असं सांगतात की विचार करून आपला मेंदू थकतो आणि त्याला विश्रांती मिळावी म्हणून आपल्याला झोप लागते. झोपेत स्वप्नं पडतात आणि ही स्वप्नं मानवी जीवनातला आणखी एक गूढ क्रियाव्यापार समजला जातो.
आधुनिक शास्त्र मानतं की मानवी निद्रेच्या काही अवस्था असतात. त्यापैकी एक अवस्था रॅपिड आय मूव्हमेन्ट (आरईएम). माणसाला या आरईएमदरम्यान स्वप्न पडतात असं सिद्ध झालं असलं तरी स्वप्नं पडायची प्रक्रिया, त्यांचं कार्य आणि उपयोग याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही.

एकोणीसाव्या शतकापासून फ्राॅईड, युंग यांच्यासारख्या मनोवैज्ञानिकांनी स्वप्नांची निर्मिती आणि त्यांचा अर्थ जाणण्यासाठी अभ्यास केला आहे. त्यानी स्वप्नांचा संबंध अांतरमनाच्या स्थिती आणि कार्याशी लावला आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या अतृप्त इच्छा-आकांक्षांचा परिणाम स्वप्नांवर पडत असल्याचं या मनोवैज्ञानिकांचं मत आहे. या मताच्या परिशीलनासाठी फ्राॅईडने ‘अॅन इन्टरप्रिटेशन आॅफ ड्रीम्स’ नावाचा ग्रंथ रचला आहे.
असं असलं तरीही भारतीय शास्त्रांमध्ये त्यापूर्वी कित्येक शतके स्वप्नांवर अभ्यास होत असल्याचं अनेक ग्रंथांवरून सांगता येतं. उपनिषदांमध्ये विवेचन आढळतं की निद्रावस्थेत बुद्धीचं मनावरील नियंत्रण सुटतं आणि मन स्वतःची क्रिया-दृश्ये निर्माण करतं. मन हे उभयेन्द्रिय अर्थात ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेन्द्रिय दोन्ही असल्याने हे करू शकतं. यांनाच आपण स्वप्नं म्हणतो.
स्वप्नांच्या निर्मितीमध्ये मनाचं स्थान इतकं महत्त्वाचं असल्यामुळेच भारतीय भाषांमध्ये, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, सारखे वाक्प्रचार उत्पन्न झाले असावेत.

स्वप्नांसंबंधी आयुर्वेदही काही स्वतंत्र विचार करतो. त्यात मनाचं स्थान हृदय सांगितलं आहे. शरीरातील उरोहृदय आणि शिरोहृदय हे दोन्ही मनाची अधिष्ठानं म्हणून सांगता येतात. मनाच्या शरीरान्तर्गत हालचालींसाठी आयुर्वेदामध्ये मनोवह स्रोतसांचं अस्तित्व मानलेलं आहे. शरीरातील (वात-पित्त-कफ) दोष, एकेकटे, दुकटे किंवा त्रिकूटाने ही मनोवह स्रोतसं भरून टाकतात तेव्हा माणसाला भयंकर स्वप्नं पडतात असं.आयुर्वेद मानतो. या स्वप्नांचा थेट संबंध त्या माणसाच्या आरोग्याशी असतो.
भारतीय शास्त्रकारांनी स्वप्नांचे पुढील प्रकार सांगितलेले आहेत -
1. दृष्ट (पाहिलेल्या गोष्टी दिसणे)
2. श्रुत (ऐकलेल्या गोष्टी दिसणे)
3. अनुभूत (मनाने अनुभवलेल्या गोष्टी दिसणे)
4. प्रार्थित (इच्छित गोष्टी दिसणे)
5. कल्पित (कल्पना केलेल्या गोष्टी दिसणे)
6. भाविक (भविष्यसूचक गोष्टी दिसणे)
7. दोषज (वात-पित्त-कफांच्या परिणामस्वरूप गोष्टी दिसणे)

या संदर्भात भारतीय शास्त्रं सांगते की पहिल्या पाच प्रकारची स्वप्नं, ज्याच्यात्याच्या शरीर प्रकृतीनुसार पडणारी स्वप्नं, दिवसा पडलेली, विसरलेली, फार लांब किंवा फार त्रोटक स्वप्नं निष्फळ असतात.
या विवेचनावरून निश्चित होतं की
1.भारतीय शास्त्रज्ञांनी स्वप्नांचा साकल्याने अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2.त्यांच्या मते काही स्वप्नं (भविष्य) सूचक असतात.
3.(दोषांमुळे उत्पन्न होणारी) स्वप्नं ही ती स्वप्नं पडलेल्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित असतात.
भारतीय शास्त्र-ग्रंथांनुसार सूचक स्वप्नांमधून अर्थनिश्चिती कशी होऊ शकते, याचा पुढे उहापोह करण्याचा प्रयत्न करता येईल परन्तु तूर्तास स्वप्न-कळ्यांमागील शास्त्राची माहिती करून घेणं उपयुक्त व्हावं.




