कल्पनेच्या सहाय्याने मानवाने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. आजही आकाशातून विमान जात असते तेव्हा छोट्यासह घरातील मोठी माणसे देखील अंगणात येऊन हे आश्चर्य आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतातच. विमानाचा शोध लागल्यापासून आजतागायत विमानाच्या रुपात आणि अंतर्गत रचनेत वारंवार बदल होत आले आहेत. शंभर वर्षापूर्वीचे विमान आणि आजचे विमान यात बराच मोठा फरक आहे हे खरे असले तरी, विमान संशोधनासाठी संपूर्ण जग आजही राईट बंधूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.
या दोघांनी ज्या जिद्दीने आणि तळमळीने विमान बनवण्याचा ध्यास घेतला ते पाहिल्यास त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. राईट बंधूंच्याही आधी अनेक लोकांनी विमान बनवण्याचा ध्यास घेतला होता. तसे प्रयोगही केले होते. पण, जे यश राइट बंधूंना मिळाले ते अनेकांना का मिळू शकले नाही? राइट बंधूंच्या संशोधनातील या काही महत्वाच्या गोष्टीवर नजर टाकल्यास त्याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.













