बार्बी डॉल... तिने फॅशन आयकॉन म्हणून पाच दशके गाजवली. ‘अटकर बांधा, गोरा गोरा खांदा’ अशी बार्बी सुरवातीची बरीच वर्षे कचकड्याच्या बाहुलीसारखी होती. पण ती जगभरातल्या मुलींच्या दृष्टीने केवळ एक बाहुली नाही, तर मैत्रीण आणि मार्गदर्शकही आहे. ती किशोरवयातल्या मुलींच्या स्वप्नांचं, आकांक्षाचं मूर्त रूप आहे.
बार्बी हे ‘टीन एजर्स मॉडेल’ असल्याने तिच्या माध्यमातून मुलींना मुली सर्व क्षेत्रात पुढं जाऊ शकतात, त्यांचं ‘बाई’ असणं त्यांच्या प्रगतीच्या आड येत नाही हा खूप महत्त्वाचा संदेश दिला गेला. यासाठी बार्बीला डॉक्टर, अंतराळवीर, खेळाडू, शेफ, आर्किटेक्ट म्हणून सादर केलं गेलं. 'यु कॅन बी एनिथिंग' ही बार्बीची टॅगलाईन खूप गाजली. बार्बी आणि कर्तृत्ववान स्त्रिया यांच्यातला हा संबंध कायम राहिला. काही वर्षांपूर्वी बार्बीची निर्मिती करणाऱ्या मॅटेल या कंपनीने कोणत्याही क्षेत्रात विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्याची एक अनोखी पद्धत सुरू केली. ती म्हणजे त्यांच्यावर आधारलेलं बार्बीचं मॉडेल लॉन्च करणं. मानसी जोशी ही पॅरा बॅडमिंटन प्लेयर नुकतीच या बहुमानाची मानकरी ठरली आहे.






