भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ टी२० सामन्यांची मालिका संपन्न झाली आहे. या मालिकेत देखील भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ५ गडी बाद १४६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १७ व्या षटकात लक्ष्य पूर्ण करत ६ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाचा सलामीवीर फलंदाज गुणतीलका खाते ही न उघडता माघारी परतला. त्यानंतर पथुम निसंका देखील १ धाव करत माघारी परतला. तर असलंकाने ४ आणि लियानगेने अवघ्या ९ धावा केल्या. श्रीलंका संघाकडून दसून शनाकाने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला २० षटक अखेर ५ बाद १४६ धावा करण्यात यश आले होते.
भारतीय संघाने मिळवला जोरदार विजय
हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला १४७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार तर १ षटकार मारला. तसेच शेवटी रवींद्र जडेजाने ताबडतोड २२ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
श्रेयस अय्यरची अप्रतिम कामगिरी
भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यरने या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने मालिकेतील तीनही सामन्यात महत्वाची खेळी केली आहे. पहिल्या टी२० सामन्यात त्याने नाबाद ५७ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने नाबाद ७४ धावांची खेळी केली होती. तसेच अंतिम टी२० सामन्यात देखील त्याने नाबाद ७३ धावांची खेळी केली आहे. या खेळीच्या जोरावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.




