सचिन तेंडुलकर नंतर विक्रमांचा बादशाहा म्हणून विराट कोहली ओळखला जाईल. हे आम्ही नाही म्हणत आहोत, हे त्यानेच वेळोवेळी सिद्ध केले आहे. आहे टेस्ट असो वनडे असो की टी ट्वेन्टी, पठ्ठ्या एका मागून एक विक्रम करत पुढे चालला आहे. याला आयपीएल तरी कसे अपवाद असेल? आयपीएलच्या बहुतांश विक्रमांच्या यादीत देखील भाऊ पहिल्या क्रमांकावर आहेत.
यंदाच्या सिझनमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात त्याने एक नवा विक्रम केला. आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंच्या यादीत तो आधीही पहिला होता पण आता सर्वात आधी आणि सर्वात जास्त ६,००० धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना त्याने ५१ वी धाव घेऊन त्याने या विक्रमावर आपले नाव कोरले आहे. आयपीएलमधील आपल्या १९९ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ६०७६ धावा केल्या आहेत.









