आपल्या दुसऱ्याच आयपीएल सामन्यात अर्धशतक ठोकून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा कोलकाता नाईट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर हा खेळाडू वेगळा आहे हे तर कळून चुकले आहे. पण त्याचा प्रवासही तितकाच भन्नाट आहे. आज या खेळाडूचा हाच प्रवास आपण समजून घेणार आहोत.
व्यंकटेश जरी दक्षिण भारतीय असला तरी त्याचे आईवडिल दोन्ही मध्यप्रदेशातल्या इंदूर येथे नोकरीला होते. तेथेच तो लहानाचा मोठा झाला. सहसा असे होते की आईवडील मुलांना खेळण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्यायला सांगतात, पण या भावाच्या बाबतीत वेगळे होते. त्याचे आईवडील त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करत, पण त्याचे चित्त अभ्यासात जास्त होते.
मजा म्हणून क्रिकेट खेळताना तो कधी क्रिकेटचा मास्टर झाला त्याला पण समजले नाही. बी. कॉम.ला ऍडमिशन घेऊन त्याने सीएची तयारी सुरु केली होती. सीए इंटरमीडियट पण त्याने पास केली होती. पण त्याचे मन बदलले आणि त्याने सीए सोडून एम.बी.ए. ला ऍडमिशन घेतले.






