आपल्याकडे सध्या बायोपिकचं पीक आलंय. आधी बालगंधर्व, मग लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर आणि भाई व्यक्ति की वल्ली नंतर आता नवीन सिनेमा येतोय आनंदी गोपाळ!!
आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचं नाव माहीत नसेल असा मराठी माणूस नसेल. आनंदीबाई ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यामुळं त्यांचं नाव बऱ्याच सरकारी दवाखान्यांनाही दिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण या आनंदीबाई त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करण्याआधीच मरण पावल्या आणि भारताच्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाई सावे यांचं नाव घेतलं जातं. अर्थात त्यामुळं आनंदीबाईंचं कर्तुत्व कमी होत नाही. त्यांच्या आयुष्यावर याआधी पुस्तकं आणि दूर्दर्शन मालिका आल्या होत्याच, आणि आता सिनेमा निघतोय ही खचितच चांगली गोष्ट आहे. पण हा सिनेमा खरोखरी त्यांचं आयुष्य नीट दाखवेल की लोकांना माहित असलेल्या त्याच त्या खोट्या कहाण्या पुन्हा रंगवून सांगेल??






