कल्पना करा, एक माणूस मिळालेला पैसा हवेत उधळतोय. असातसा मिळालेला पैसा नाही तो. अगदी त्याच्या कष्टाचा, भल्या मार्गाने मिळालेला पैसा. वार्याबरोबर त्या नोटा कागदाच्या क्षुद्र कपट्यांप्रमाणे इतस्तत: विखुरल्या जात आहेत. आणि नंतर चक्क कोल्हे, तरस त्या नोटांची विल्हेवाट लावत आहेत. तुम्ही या कृतीला काय म्हणाल? मूर्खपणा? वेड? उन्माद? माज? की आणखी काही...
खरंतर अशी विक्षिप्त गोष्ट प्रत्यक्षात घडली होती. ती घडली होती ती आफ्रिका खंडातल्या नामिबिया नावाच्या देशात, अन त्यामागचं कारण होतं निव्वळ अज्ञान! तुमच्यापैकी ज्यांनी ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’ या मालिकेतले सिनेमे बघितले असतील तर त्यांना त्यातला कलहारी बुशमन नक्कीच आठवत असेल. तोच तो - पार्ट १ मधला झिझो. कमरेला केवळ लंगोटी बांधून जंगलात हिंडणारा, तीरकमठा वापरून शिकार करणारा, बारीक डोळ्यांचा, चपट्या नाकाचा आणि कुटुंबवत्सल तोंडवळ्याचा. हे काम त्यानेच केलं होतं आणि तेही कुठल्या सिनेमात नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात. त्याचं खरं नाव होतं नेक्साऊ टोमा. नामिबियामधल्या त्सुमक्वे गावात त्याचा जन्म झाला आणि त्याचं बहुतेक सगळं आयुष्यही तिथेच गेलं. तो प्रत्यक्षातही बुशमनच होता. आज जाणून घेऊ त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी-











