वाचकहो, बोभाटाच्या बागेत गेल्या दोन भागांत आम्ही ज्या वृक्षांची माहिती देतो आहोत ती कदाचित थोडी रुक्ष वाटली असण्याची शक्यता आहे. असे होणेही साहजिक आहे कारण आपल्या रोजच्या परिचयाच्या मानसिक प्रतिमांशी या वृक्षांचा तसा संबंध जुळून आलेला नसू शकतो.
उदाहरणार्थ, बकुळ म्हटली की आपलीशी वाटते. बकुळीच्या फुलांचा आणि जुन्या आठवणींचा संदर्भ अनेक गीतांतून आपण ऐकतो. आपल्यापैकी काहीजणांचे काही रोमँटिक क्षण गुलमोहोराच्या झाडाखाली काढलेल्या छायाचित्रात बंदिस्त झाले असतील. पण सगळ्याच वृक्षांसोबत असे काही खास क्षण, आठवणी, पुस्तक-सिनेमांतले संदर्भ असतत असं नाही, त्यामुळं काही झाडांसोबत 'हृदयीच्या तारा' जोडल्या गेल्या नाहीत असं होऊ शकतं. पण लक्षात घ्या की हे न जोडली गेलेली झाडे आपल्या देशी वृक्ष संस्कृतीची पुरातन सदस्य आहेत. त्यांची नव्या पिढीशी ओळख होण्याआधीच ती पुसट होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणूनच वृक्षांचे 'सोयरे'पण पुन्हा जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे .
चला तर आज आणखी काही झाडांची ओळख करून घेऊ या !









