रिवा राजघराण्याच्या दरबारात लग्नाच्या मेजवानीच्या निमित्तानं रंगलेली शाही संगीत मैफल... कलेची जाण असलेल्या राजाला त्या गायिकेच्या आवाजातल्या गोडव्यानं आणि लयदार गायनानं भुरळ पाडली होती. पण त्याचवेळी तिच्या बुरख्याआड राहून गाण्याबद्दलचं कुतूहलही त्या राजाला सतावत होतं. राजानं तिला बुरखा बाजूला करून समोर येण्याची मागणी केली. पण असं केल्यास राजाला तिच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल आणि ती ही मैफल थांबवेल असं सांगत त्या गायिकेनं बुरखा हटवण्यास नकार दिला. मैफल संपल्यावर त्या गायिकेनं बुरख्याआडूनच राजाला सांगितलं की तिच्या चेहऱ्यावर सुरीने केलेल्या ५६ घावांचे व्रण आहेत आणि ते ती कोणालाही दाखवू शकत नाही. ही गायिका होती अलाहाबादची जानकीबाई (१८८० ते १९३४). सर्वात लोकप्रिय दरबारी गवयांपैकी एक!!
जानकीबाई : चेहऱ्यावर ५६ सुरीचे वार असणारी आणि १०० वर्षांपूर्वी हजारांत मानधन घेणारी गायिका!! या छप्पनछुऱ्यांचं रहस्य काय होतं?


(जानकीबाई)
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ग्रामोफोन कंपन्यासाठी गाणाऱ्या मोजक्या आणि पहिल्या काही मान्यवर कलाकारांमध्ये जानकीबाई होत्या. जानकीबाईंचा जन्म बनारसचा. बापानं टाकल्यामुळं घर विकून एका महिलेच्या मदतीनं आई 'मानकी'सोबत त्या अलाहाबादला आल्या. पण त्या महिलेनं त्या दोघींनाही फसवून एका कोठ्यावर विकून टाकलं. पुढे काही काळानं मानकीच त्या कोठ्याची मालकीण झाली. छोट्या जानकीबाईची संगितातली आवड हेरून तिला संगीत शिकवण्यासाठी मानकीनं लखनौच्या हस्सू खान यांना पगारावर नेमलं होतं. फक्त नाचगाणंच नाही, तर इंग्रजी, संस्कृत आणि पर्शियन भाषासुध्दा जानकीबाईंनी शिकून घेतल्या होत्या. 'दिवान-ए-जानकी' नावाचा उर्दू काव्यसंग्रहही त्यांनी लिहिला होता. पद्यरचना, संगीत आणि गायन या तीनही गोष्टी करणाऱ्याला 'वाग्गेयकार' म्हटलं जायचं. जानकी बाईसुध्दा एक वाग्गेयकार होत्या.

त्याकाळात ग्रामोफोनसारख्या पाश्चात्य यंत्रावर आपला आवाज देणं म्हणजे देवाचा कोप ओढवून घेणं अशी समजूत होती. पण जानकीबाईंनी ग्रामोफोन रेकॉर्डिंगसाठी १९०७ पासूनच गायला सुरुवात केली होती. काहींच्या म्हणण्यानुसार त्यांची सुरूवातीची काही गाणी 'फ्रेड्रीक विल्यम गैसबर्ग' या संगीतकारानं रेकॉर्ड केली होती. हा मनुष्य ग्रामोफोन रेकार्डिंग कंपनीचा एजंट होता. पण त्या रेकॉर्डिंग्ज हरवल्या किंवा नष्ट झाल्या. रेकॉर्ड होणाऱ्या गाण्याचा शेवट जानकीबाई "मेरा नाम जानकी बाई अलाहाबाद" असं म्हणून करायच्या. हिच पध्दत तात्कालीन लोकप्रिय कलाकार 'गौहर जान' सुध्दा वापरत होती. तिचं वाक्य होतं 'माय नेम इज गौहर जान'. दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचमच्या अलाहाबाद भेटीवेळी भारतातल्या मोठमोठ्या शाही राजघराण्यांसोर दोघींनी मिळून गायन केलं होतं. यात खास महाराजांसाठी संगीतबध्द केलेलं 'यह जलसा ताजपोशी का मुबारक हो, मुबारक हो' हे गाणंही होतं. खुश झालेल्या राजाकाडून १०० गिन्न्यांचं बक्षिस दोघीनी जिंकलं होतं.

(गौहर जान)
१९०७ च्या काळात जानकीबाईंना २० गाणी रेकॉर्ड करण्यासाठी २५० रूपये मानधन मिळायचं. हेच पुढच्या काही वर्षांत २४ गाण्यांसाठी ९०० रूपये इतकं वाढलं आणि शेवटीशेवटी ते २० गाण्यांसाठी ५,००० रूपयांवर गेलं. त्यांनी इतर रेकार्डिंग कंपन्यासाठीही गाणी गायली. त्यांची वाढणारी लोकप्रियता बघून रेकार्डिंग कंपनीनं त्यांच्याशी Exclusive करार केला आणि १९१३ पासून जानकीबाईंच्या रेकार्डिंग डिस्क जांभळ्या रंगात विकल्या जाऊ लागल्या. त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा दिल्याचा तो एक मापदंड होता.
१९२० च्या काळात, म्हणजे कारकीर्दीच्या शिखरावर असताना एका संगीत कार्यक्रमासाठी तब्बल २,००० रूपये मानधन देणाऱ्या ऑफर्स जानकीबाईंना येऊ लागल्या. त्यामुळं साहजिकच ग्रामोफोन कंपनीकडूनही त्यांनी जादा फी आकारायला सुरूवात केली. George Walter Dillnutt या एजंटसोबत १९१६ आणि Robbert Edward Beckett या एजंटसोबत १९२३ मध्ये रेकार्डिंग केलं होतं. जानकीबाईंनी त्यानंतर आलेल्या इलेक्ट्रॉनिक रेकार्डिंगचं नवखं तंत्रज्ञानही आत्मसात केलं आणि Beckett व Arthur James Twine यांच्यासोबत १९२८ मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रेकार्डिंग केलं.

चेहऱ्यावरच्या ५६ घावांमुळे लोक जानकीबाईंना 'छप्पन छुरीवाली' या नावानं ओळखायचे. या चाकूच्या घावांमागे अनेक किस्से सांगितले जातात. त्यापैकी एक म्हणजे जानकीबाईंनी ज्या माणसाला नाकारलं होतं त्याने हा बदला घेतला होता, तर दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते की हे कृत्य जानकीबाईंची सावत्र आई लक्ष्मी आणि तीचा प्रियकराचं होतं. या दोघांना म्हणे जानकीबाईंनी रंगेहाथ पकडलं होतं. चेहरा लपवला असला तरी राजावर त्यांच्या संगीतानं मोहिनी घातली होती. रीवा राज्यातल्या अनेक संगित मैफिलींसाठी जानकीबाईंना आमंत्रित केलं जायचं आणि त्यांच्यावर अनेक मौल्यवान भेटवस्तूंची खैरात व्हायची.

जानकीबाईंच्या रेकॉर्डींग्सपैकी बहूतेक रेकार्डिंग्ज या भजन, कजरी, चैती (चैत्र महिन्यात गायली जाणारी गीतं), होरी (होळी गीतं) अशा अर्ध-शास्त्रीय शैलीच्या आहेत. १९०७ ते १९२९ या काळात जानकीबाईंनी २५० गाणी डिस्कवरती रेकॉर्ड केली होती. आजकाल नवा आयफोन घेण्यासाठी जशा रांगा लागतात, तशा त्याकाळात जेव्हा त्यांच्या नवीन गाण्याच्या डिस्क विक्रीला यायच्या, त्या विकत घेण्यासाठी अलाहाबादमधल्या दूकानांबाहेर लोकांची मोठी गर्दी व्हायची. त्यांच्या बऱ्याच रेकॉर्डिंग्सच्या २५ हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. त्याकाळाचा विचार करता ही संख्या बरीच मोठी आहे.
जानकीबाईंनी अलाहाबादच्या 'शेख अब्दूल हक' नावाच्या वकिलाशी लग्न केलं होतं. पण तो फसवा निघाल्यानं हे नातं काही वर्षांतच संपुष्टात आलं. त्यानंतर भौतिक सुखांपासून दूर जात जानकीबाईंनी स्वतःच्या नावानं एका चॅरिटेबल ट्रस्टची सुरूवात केली. हा ट्रस्ट आजही अलाहाबादमध्ये म्हणजे आजच्या प्रयागराजमध्ये कार्यरत आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं, गरिबांना चादरी आणि अन्न वाटणं, मंदिर-मशिदींना दान करणं, धर्मशाळा उभारणं अशा अनेक कारणांसाठी आपल्या ट्रस्टला आपली सगळी संपत्ती त्यांनी वाटून टाकली. १९३४ मध्ये अलाहाबादमध्येच या छप्पनछुरी जानकीबाईंचा मृत्यू झाला.
ज्या विहिरीचं पाणी पिऊन जानकी बाईंचा आवाज गोड झाला असं मानलं जातं, ती विहीर केव्हाच आटून गेली आहे. मात्र आजही अलाहाबादमध्ये जानकी बाईंच्या गोष्टी आवडीने सांगितल्या जातात. अगदी आजही लोकांना रात्रीच्या वेळी त्या जिथे रहायच्या त्या जागेतून बाईच्या पैंजणांचा आणि गाणी आळवण्याचा आवाज येतो असं म्हणतात.
आणखी वाचा :
मास्टर मदन- १४ वर्षांच्या या असामान्य प्रतिभेच्या गायकाला पारा खायला घालून कुणी का मारलं असेल?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१