भारतीय चित्रपट आणि त्यातही टॉलीवूडचे चित्रपट तर आजकाल सगळीकडेच हवा करत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या चित्रपटांची दखल घेतली जात आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला सूरराई पोटरू हा तमिळ चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपट सृष्टीही झाकोळून गेली होती, पण या वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपट क्षेत्रात एक चांगली बातमी येऊन थडकली आहे.
तमिळ मधील सूरराई पोटरु हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० मध्ये अमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. लॉकडाऊन काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणारा हा पहिलाच तमिळ चित्रपट ठरला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाला रसिक प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचीही चांगली दाद मिळाली.








