'जे पिकतंय ते विकतंय' हे जुनं झालं, सध्या 'जे ट्रेंड होतंय ते विकतंय' असंच म्हणायचे दिवस आले आहेत. हो बघा ना! नुकताच अमेरिकेचे सिनेट सदस्य बर्नी सँडर्स यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे बर्नी सँडर्स यांच्या फोटोची. त्यांची अत्यंत साध्या पोशाखात पाय क्रॉस करून बसलेली आकृती इतकी प्रसिद्ध झाली की त्याच्या मीम्स बनल्या. त्या हसून हसून पोट दुखवणाऱ्या मीम्स फक्त अमेरिकेत नाही तर जगभर व्हायरल झाल्या आहेत. भारतात ही अनेक प्रसिद्ध सिनेस्टार्सनी आपल्या इंस्टा पेजवर या मीम्स प्रसिद्ध केल्या आहेत.
याच मजेदार फोटोच्या मीम्सचा फायदा टेक्सासच्या ४६ वर्षीय महिलेने घेतला आणि आज ती प्रसिद्ध झाली आहे. टेक्सासच्या कॉर्पस क्रिस्टी येथे राहणारी टोबे किंग असे त्या महिलेचे नाव आहे. तिने बर्नी सँडर्स यांचा व्हायरल झालेल्या फोटोची हुबेहूब जुळणारी लोकरीची बाहुली तयार केली आणि ती बाहुली चक्क १४ लाखात (२०,३०० डॉलर्स) विकली आहे. विश्वास बसायला अवघड जातंय ना?






