मासिक पाळीबद्दलच्या ११ अंधश्रद्धा ज्या आजही पाळल्या जातात !!

लिस्टिकल
मासिक पाळीबद्दलच्या ११ अंधश्रद्धा ज्या आजही पाळल्या जातात !!

नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वी अशा गावाबाहेरच्या झोपडीत बायका मेल्याची बातमी सगळीकडे झाली होती. हे झालं आजही मासिक पाळीच्या बाबतीत काही अंधश्रद्धा आजही बाळगल्यानं. भारतात परिस्थिती थोडी बरी आहे, पण खूप काही वेगळी नाहीय. आपण आजही जुन्यापुराण्या अंधश्रद्धांना कवटाळून बसलो आहोत. आणि जर त्या अंधश्रद्धा मासिक पाळीसोबत निगडित असतील तर काही म्हणून विचारु नका.

(नेपाळ मधल्या स्त्रियांना मासिक पाळीच्यावेळी अशा झोपड्यांमध्ये ठेवतात)

आज (२८ मे) जागतिक मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने भारतात अजूनही मासिक पाळीच्या संदर्भात कोण कोणत्या अंधश्रद्धा अजूनही टिकून आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. अहं, काळजी करू नका. याबाबतीत बरेच देश आपल्यासोबतच आहेत. यातल्या बऱ्याच अंधश्रद्धा भारतातच नाही, तर सगळ्या जगभर पसरल्या आहेत.  पण कसं आहे, आपण राहतो भारतात. म्हणून आधी आपल्या आजूबाजूला काय चाललेय ते आधी बघूयात. काय म्हणता? 

आधी पाहू की मासिक पाळी येते म्हणजे नक्की होते काय? 

आधी पाहू की मासिक पाळी येते म्हणजे नक्की होते काय? 

अजूनही कित्येक स्त्री -पुरुषांना याचं कारणच ठाऊक नसतं. ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला स्त्रीबीज तयार होतं. जर त्याचा पुरुष शुक्राणूशी संपर्क आला तर तिला गर्भ राहातो. अशा वेळेला त्या बीजाला आधार देण्यासाठी म्हणून तिथे रक्ताची एक गादी तयार होते. आता दर महिन्याला काही बाईच्या पोटामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिलन काही होत नसतं. त्यामुळे जेव्हा असे फलित होणारे स्त्रीबीज मिळत नाही, ही तेव्हा ती रक्ताची गादी तुटते आणि ते रक्त योनीवाटे बाहेर पडते.

हे आहे  मासिक पाळी येण्याचे साधे सोप्पे कारण.  मग आम्ही हेच रक्त अपवित्र,  मग ते रक्त जिच्या शरीरातून वाहून जाते ती बाई अपवित्र असं म्हणत म्हणत तिला विटाळशी करतो आणि तिच्यावर नसत्या नियमांचं ओझं लादतो. एकाबाजूला लग्न झालेल्या बाईला मूल व्हायलाच पाहिजे हा धोशा आणि ते होण्यासाठी जी रक्ताची गादी लागते ती तुटली की बाई अपवित्र असा विरोधाभास आहे मंडळी.  

बघूयात मग आपल्याकडे मासिक पाळीच्या संदर्भाने  काय काय अंधश्रद्धा आहेत..

१. मासिक पाळी आलेल्या मुलींने किंवा बाईने स्वयंपाक घरात जायचं नाही.

१. मासिक पाळी आलेल्या मुलींने किंवा बाईने स्वयंपाक घरात जायचं नाही.

तरी आता बाई घराबाहेर पडून नोकरीला लागल्यानंतर ही अट बरीच शिथिल झालीय. तीही बाईला बरं वाटावं म्हणून शिथिल झाली नाहीय, तर स्वयंपाक कुणी करायचा या भानगडीतून, "बाई, तू देवाचं काही करु नकोस, पण रोजचा स्वयंपाक करायला काही हरकत नाही"पर्यंत प्रकरण येऊन थांबलं आहे. 

२. मासिक पाळी आलेल्या बाईने देवघरात आणि मंदिरात तर पाय मुळीच टाकायचा नाही

२. मासिक पाळी आलेल्या बाईने देवघरात आणि मंदिरात तर पाय मुळीच टाकायचा नाही

इतकंच काय, पाळी आलेल्या बाईने देवाचा प्रसाद घेणे, नामस्मरण करणे असे प्रकार तर मुळीच करायचे नाहीत.

३. पाळी आलेल्या बाईने घरातल्या सणा-समारंभात सामील व्हायचं नाही.

३. पाळी आलेल्या बाईने घरातल्या सणा-समारंभात सामील व्हायचं नाही.

हो, म्हणून मग वर्षाचे सण, गौरी-गणपती कधी आहेत, आपल्या पाळीची तारीख कधी आहे हे  पाहायचे आणि गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलायची.  नंतर मग पोटात दुखून तुमचं काही का होईना, कितीही जास्त रक्तस्राव का होईना, देव तुमच्या विटाळापासून दूर राहायला हवेत हे अधिक महत्त्वाचं आहे. साऊथ इंडियात तर लोक बाईला पाळी कधी सुरु असेल, एखादी निर्लज्ज विटाळशी बाई मंदिरात येऊन मंदिर भ्रष्ट करेल या विचाराने बायकांना चान्सच देत नाहीत. ते सरळ पाळी येणाऱ्या वयाच्या सगळ्याच बायकांना मंदिरात प्रवेश निषिद्ध करुन टाकतात. भारी आयडिया आहे ना त्यांची? 

४.  पाळी आलेल्या बाईने वर्षभराच्या केलेल्या  लोणची-चटण्या यांना हात लावायचा नाही

४. पाळी आलेल्या बाईने वर्षभराच्या केलेल्या लोणची-चटण्या यांना हात लावायचा नाही

ही समजूत जगभर आहे मंडळी. विटाळशी बाईने हात लावलेलं लोणचं खराब होतं, तिनं केलेले अनारसे फसतात, तिने केलेले मेयॉनीज नासतं, तिने केलेलं व्हिप्ड क्रीम खराब होतं.. एक ना दोन!!

५. पाळी चालू असताना केस धुवायचे नाहीत

५. पाळी चालू असताना केस धुवायचे नाहीत

 ही पण समजूत जवळजवळ जगभर सगळीकडे आहे मंडळी. त्यामुळे कुठे म्हणतात कमी रक्तस्राव होतो तर काहीजण म्हणतात की रक्तस्राव होतो. कमी रक्त गेलं तर ते रक्त पोटात राहून बाई जास्त दिवस अपवित्र राहाते म्हणे. 

६.  पाळी आलेल्या बाईने टँपॉन वापरायचे नाहीत. टँपॉन हे साधारणपणे असे असतात.

६. पाळी आलेल्या बाईने टँपॉन वापरायचे नाहीत. टँपॉन हे साधारणपणे असे असतात.

पाळी चालू असताना पॅडऐवजी वापरायचे हे एक साधन आहे.  भारतात तसे टँपॉन खूपजणी वापरत नाहीत. खेळाडू मात्र बरेचदा वापरतात. तर, लोकांना वाटतं की टँपॉन वापरल्यानं कौमार्यभंग होतो आणि त्यामुळे आपली भारतीय संस्कृतीही भंग पावते.  

७. पाळी आलेल्या बाईला कोणी शिवायचं नाही.

७. पाळी आलेल्या बाईला कोणी शिवायचं नाही.

म्हणून मग तिला कावळा शिवतो. 

८. पाळीच्या रक्तात फार ताकद असते

८. पाळीच्या रक्तात फार ताकद असते

या समजुतीमुळे अघोरी विद्या तंत्र-मंत्र, जारण-मारण करणारे लोक त्यांना हे रक्त हवे असते आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. 

९. ऋतुमती म्हणजेच पाळी आलेली बाई,  तिचा बळी दिला की मोठं घबाड सापडते.

९. ऋतुमती म्हणजेच पाळी आलेली बाई, तिचा बळी दिला की मोठं घबाड सापडते.

ही समजूत पुन्हा अघोरी विद्या तंत्र-मंत्र, जारण-मारण करणारे लोकांचीच आहे. काही लोक त्यांच्या भजनी लागतात आणि मग अशा निष्पाप जीवांचा बळी जातो. 

१०. सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणं म्हणजे मोठा गुन्हा आहे.

१०. सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणं म्हणजे मोठा गुन्हा आहे.

 त्यामुळे मेडिकलवाला पॅडस् वर्तमानपत्रात गुंडाळून, काळ्या पिशवीत लपेटून तुमच्या हातात असं सोपवतो ही जणू तो चोरी करतोय आणि कुणी त्याला पाहतो की काय!!  या टॅबूमुळे आजही खेड्यापाड्यातल्या बर्‍याच स्त्रिया जुने कपडे वापरताना दिसतात.  त्या कपड्यांची स्वच्छता आणि परिणामी त्या बाईच्या योनीची स्वच्छता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. यातून बरेच आजार उद्भवतात आणि बऱ्याच स्त्रिया त्यांच्या अज्ञानामुळे त्या रोगांना बळी पडतात. 

११. पाळीच्या रक्ताने भिजलेल्या कपड्यांना सापाने स्पर्श केला तर त्या बाईला आयुष्यभर मुलं होऊ शकत नाहीत.

११. पाळीच्या रक्ताने भिजलेल्या कपड्यांना सापाने स्पर्श केला तर त्या बाईला आयुष्यभर मुलं होऊ शकत नाहीत.

कचऱ्यात टाकलेल्या पॅड किंवा वापरलेल्या कपड्याला  सापाने स्पर्श केला तर त्या बाईला आयुष्यभर मुलं होऊ शकत नाहीत हा मोठा जोक आहे. 

 

काहीलोकांना या  गैरसमजुती किंवा अंधश्रद्धा आजच्या काळात मागे पडल्या आहेत असं वाटेल. हो, काहीप्रमाणात हे कमी झालंय हे सत्य आहे, पण त्याचा सगळीकडे योग्य तो प्रचार झाला नाही हे ही तितकंच सत्य आहे. भारतातल्या स्त्रियांच्या सुदैवाने त्यांना नेपाळसारखे गावाबाहेरच्या झोपडीत राहावं लागत नाही.

तेव्हा मंडळी, आपण थोडी विज्ञानाची कास धरु आणि आज जागतिक मासिक पाळीच्या निमित्ताने  या अंधश्रद्धांना खतपाणी न घालण्याची शपथ घेऊ.

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख