मंडळी, तुमच्यापैकी कितीजणांचा 'लकी' नंबरवर विश्वास आहे ? जर 'लकी' नंबरवर तुमचा भरवसा असेल तर 'अनलकी' नंबर वर पण तुमचा विश्वास असेल. नाही का? तुमचा लकी नंबर काही असू द्या, अनलकी नंबर असं म्हटलं बहुमताने निवडून येणारा आकडा म्हणजे '१३'. या १३ नंबरला भले भले घाबरतात. या तारखेला लोकं कामाचा शुभारंभ करणं टाळतात, १३ नंबरचा बर्थ मिळाला तर रिझर्वेशन रद्द करतात असे पण कायच्याकाय किस्से तेरा या संख्येबद्दल आहेत. मंडळी, बोभाटाचा या असल्या फंड्यावर विश्वास नाही. पण मनोरंजन म्हणून या १३ आकड्याबद्दल आज काही गमतीदार गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१३ हा आकडा अशुभ का समजला जातो ?


भारतीय पुराणकथांमध्ये तेरा हा आकडा अशुभ वगैरे असल्याचे काही उल्लेख नाहीत. पण ज्या देशांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे त्या देशात १३ म्हणजे एकदम 'डेंजर' आकडा समजला जातो. या तेराच्या आकड्याचा संबंध येशू ख्रिस्ताच्या 'लास्ट सपर' सोबत जोडला गेला आहे. लास्ट सपर म्हणजे ख्रिस्ताने त्याच्या बारा शिष्यांसोबत घेतलेले शेवटचे जेवण. यानंतर येशू ख्रिस्ताच्या 'ज्युडास' या शिष्याने चांदीच्या काही नाण्यांच्या मोबदल्यात ख्रिस्ताला रोमन सैनिकांच्या हवाली केले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून जेवणाच्या टेबलवर तेरा जणांची व्यवस्था करणे टाळले जाते. लंडनच्या सॅव्हॉय या हॉटेलात जर टेबलवर तेरा माणसं असतील तर चौदावी खुर्ची कॅस्पर नावाच्या एका काळ्या मांजरासाठी ठेवली जाते. सगळ्या पाहुण्यांना जे पदार्थ वाढले जातात ते कॅस्परच्या थाळीत पण वाढले जातात. ही प्रथा या हॉटेलात १९२० सालापासून आजही पाळली जाते.

पारशी धर्मग्रंथांच्या कालमापन पध्दतीने ३००० वर्षांचा एक कालखंड समजला जातो . असे तीन कालखंड झाल्यावर जे १३००० वे वर्ष येईल ते एका मोठ्या लढाईचे असेल असे मानतात. सैतान आणि भगवान यांच्या युध्दाचा हा काळ असेल. अर्थातच हे वर्षं संपेल तेव्हा देवाचा विजय झालेला असेल. पण ही वर्षे कुठून मोजायला सुरुवात करायची याचा उल्लेख त्या ग्रंथात नाही.
भविष्य कथनाचा एक प्रकार म्हणजे टॅरो कार्ड - या टॅरो कार्डात १३ वे कार्ड 'डेथ कार्ड ' समजले जाते. युरोपियन देशांमधे अनेक इमारतींमधे १३वा मजला, तसंच १३ नंबरची गल्लीच नसते! एवढंच काय, ‘Triskaidekaphobia’ म्हणजेच १३ ह्या आकड्याची प्रचंड भीती वाटणे हा एक मोठा मानसिक आजार आहे. जेव्हा ‘अपोलो १३’ ह्या नासाच्या चंद्रयानामधे बिघाड झाला होता तेव्हा तर या आकड्याची लोकांना आणखीनच भीती वाटू लागली, परंतु ते सुखरूप परत आलं. ह्या सर्व प्रकारांमुळे ‘१३ नको रे बाबा’ ही लोकांची धास्ती आणखीन वाढली.

याउलट आग्नेय आशियात म्हणजेच चीन, जपान या देशांत ४ हा आकडा विध्वंस, मृत्यू ह्यांचं प्रतिक मानलं जातं. ह्या प्रदेशांमधे ४ हा आकडा कोणत्याही मोबाईल नंबर, सार्वजनिक स्थळी, ओळखपत्रावर वापरला जाणं निषिद्ध आहे. जपानमधे काही इमारतींमधे ४० ते ४९ हे मजलेच नाहीत! म्हणजेच ३९ व्या मजल्यानंतर सरळ ५० वा मजला!! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिथे कोणालाही ४ अंक असलेली वस्तू भेट म्हणून दिल्यास ती खुनाची धमकी समजतात!

भारतीय अंकशास्त्राच्या भविष्य कथन पद्धतीत १३ आणि ४ या दोन्हीमध्ये काही फरकच नाही. या पद्धतीत १ ते ९ हे आकडे एकेका ग्रहाशी जोडले गेले आहेत. उदाहरणार्थ, १ म्हणजे सूर्य, २ म्हणजे चंद्र, ३ म्हणजे गुरु आणि ४ म्हणजे हर्षल. या ग्रहांच्या गुणधर्माचे प्रतिबिंब त्या त्या आकड्यात आहे असे या भविष्यशास्त्राचे गृहीतक आहे असे समजले जाते. हर्षल म्हणजे क्रूर विध्वंसकारी, रक्तरंजित क्रांतिकारी, आकस्मिक बदल घडवून आणणारा असा ग्रह समजला जातो. म्हणून १३ म्हणजेच ४ आणि ४ म्हणजेच विनाश असा समज आहे. परंतू हा समज जुन्या कोणत्याही ग्रंथात नाही. कारण, तेव्हा हर्षल ग्रहाचा शोधच लागला नव्हता.

पण ह्याला अनेक अपवादही आहेत हां! प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू आणि क्रिकेटर फॅफ डू प्लेसिस ह्यांचा जन्म अनुक्रमे १३ फेब्रुवारी आणि १३ जुलैचा, तर अफाट बुद्धिमान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचा जन्म ४ जानेवारीचा! त्यामुळे या थिअरीजवरती विश्वास ठेवायचा की नाही हा डिसिजन तुमचा आहे राव!!

आता मजा बघा. २३/०५/२०१९ ही सुप्रसिद्ध तारीख बघा. यातल्या सर्व अंकांची बेरीज केली तर ती येते २२. आणि २+२=४. म्हणजे जर ही थिअरी खरी असेल तर एकूणच २३/०५/२०१९ ही तारीख कोणासाठी अशुभ होती तर कोणासाठी शुभ पण होती.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१