जन्माला आलेल्या क्षणापासून तो योध्दा आहे हे सिध्द कराव्या लागणार्या एका नवजात शिशूची ही कथा आहे. असं काय घडलं होते त्या बाळासोबत? अशी कोणती लढाई त्याला जन्माला येतानाच लढावी आणि जिंकावी लागली? चला जाणून घेऊ या चिरंजीवाची कथा !
हा योद्धा आहे उत्तर बंगळुरूच्या रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नुकतेच जन्मलेले बाळ.. या बाळाला आपला पहिला श्वास घेण्यासाठी तब्बल ११ मिनिटे झगडावे लागले. हे बाळ फ्लॅपी कंडिशनमध्ये म्हणजे शरीरावर कोणतेही नियंत्रण नसलेले- जन्माला आले होते. म्हणजेच जन्म झाल्यावर ते श्वास घेऊ शकत नव्हते की रडू शकत नव्हते किंवा त्याचे हृदयाचे ठोकेही ऐकू येत नव्हते. शरीराची, श्वासोच्छवासाची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. जवळजवळ मृतवत अवस्थेत ते जन्माला आले होते. पण ते 'जवळजवळ' मृतावस्थेत होते, म्हणजे अजूनही जीवनाची धुगधुगी शिल्लक होती. आणि पुढच्या ११ मिनिटात तो चमत्कार घडला, बाळाने श्वास घ्यायला सुरुवात केली.









