तुम्हाला लहानपणी वाचलेल्या मुलांच्या मासिकातल्या कथा आठवतात का? या कथांमध्ये बर्याच वेळा 'विषकन्या' असा उल्लेख असायचा. विषकन्या म्हणजे बालपणापासून विषाच्या मात्रा देऊन वाढवलेली मुलगी! ही मुलगी मोठी झाली की तिच्यासोबत संग करणारा माणूस तिच्या विषाने मरण पावायचा. आपण वाचलेल्या कथांमध्ये अशा विषकन्या कट करून राजाकडे पाठवल्या जायच्या आणि मग त्यामुळे राजाच्या जीवाला धोका उत्पन्न व्हायचा. चंद्रकांता मालिकेतपण अशा विषकन्या पाह्यल्याचं तुम्हांला आठवत असेलच.
वाचकहो, सांगायची गोष्ट अशी आहे की शत्रूला गारद करण्यासाठी असे प्रयोग करण्याचे दुष्ट विचार अगदी पुरातन काळापासून मानवी मनात खदखदत आहेत. आता नव्या काळात फक्त प्रयोगांची दिशा बदलली आहे आणि विषकन्येची जागा जंतूंनी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रांची त्याला जोड मिळाली आहे आणि या प्रयोगाला जैविक युध्द ((Biological Warfare) असे नवे नाव मिळाले आहे. तोफ-बंदूकांच्याऐवजी शत्रूवर जंतूंच्या माध्यमातून हल्ला करून त्याला संपवणे म्हणजे जैविक युध्द!! हे एक महाभयानक अस्त्र आहे. जैविक युध्दाची तयारी करताना एखादी चूक झाली तर ते अस्त्र उलटू पण शकते. अशा उलटलेल्या करणीतून सोव्हिएत रशियाच्या निष्पाप नागरिकांना काय भोगावे लागले याची कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.











