भाग १ : निर्माण केलेलं जैविक अस्त्र त्या देशावरच उलटतं तेव्हा.. कसं, केव्हा आणि कुठे घडलं हे??
हे काय प्रकरण होते?
१९७२ साली सोव्हिएत रशियाने जैविक अस्त्रांवर बंदी घालणार्या करारावर सह्या केल्या. पण वर्षभरातच ५०००० माणसं भरती करून ५२ वेगवेगळ्या ठिकाणी जैविक अस्त्रांची निर्मिती सुरु केली. या उपक्रमाचे नाव होते बायोप्रीपॅरॅट!!
अँथ्रॅक्स जंतूंचे प्रसारण ज्या कारखान्यातून झाले त्याचे गुप्त नाव (कोड नेम) होते कंपाउंड 19-A. अशा अनेक वेगवेगळ्या कारखान्यांतून रशिया शेकडो टन वेगवेगळ्या जातीच्या डझनावारी जंतूंची निर्मिती करून साठवण करत होता. ज्या प्योत्र बुर्गासेव्ह(पिटर बर्गासेव्ह) चा उल्लेख आधी केला आहे, तो पण अशाच एका कारखान्यात काम करत होता. उरल समुद्राच्या आसपास असलेल्या एका शहराजवळ स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचे जंतू बनवण्याची कामगिरी तो करत होता. अशाच एका प्रयोगादरम्यान हे देवीचे जंतू हवेत पसरले. दहा माणसांना लागण झाली. तीनजण मरण पावले. सांगायचा मुद्दा असा आहे की असे अपघात या उपक्रमात होत होते, पण फक्त अँथ्रॅक्स प्रकरण उघडकीस आले आणि बाकी प्रकरणे दाबली गेली.







