कोव्हीड-१९ मुळे संपूर्ण जगाची चाके गेली वर्षभर एकाच जागी रुतून बसल्यासारखी झाली आहेत. अतिवेगाने पसरणाऱ्या या आजारावर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तरी हे जग पूर्वपदावर येणे अशक्यच आहे. आनंदाची बाब म्हणजे या आजारावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे आणि या लसी कितपत प्रभावी ठरतात याची पडताळणी देखील सुरु झाली आहे.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड या दोन्ही लसींची चाचपणी सुरु आहे. सध्या यातील कोव्हॅक्सीनने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कोव्हीड विरोधात अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या. याची आता तिसऱ्या टप्प्यातील चाचपणी सुरु आहे. भारत सरकारनेही या लसीची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनला अँटिबॉडिज तयार करण्यात यश आले असले तरी, त्याची परिणामकारकता अजून सिद्ध झालेली नाही. म्हणून त्याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजून बाकी आहे.
आता आपल्या लेखाच्या मूळ मुद्द्याकडे वळूया. लस देण्यापूर्वी कंपनीकडून एक संमतीपत्र लिहून घेतलं जात आहे. आजच्या लेखातून ह्या संमतीपत्रात नमूद केलेले मुद्दे आणि त्यांचे परिणाम आम्ही समजावून सांगणार आहोत.








