सृष्टी आज जशी दिसते तशी काही लाख वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती. हवामानातील बदलांनी समुद्राचा वाळवंट झाला, तर जिथे वाळवंट होतं तिथे हिरवं रान उभं झालं. याचा एक नवीन पुरावा नुकताच पुरातत्वज्ञांच्या हाती लागला आहे. थारच्या वाळवंटात बिकानेरजवळ तब्बल १,७२,००० वर्षं जुनी नदी आढळून आली आहे. ही नदी काळाच्या ओघात लुप्त झाली आणि तिच्या खुणाही उरल्या नाहीत. पण आता तिचा प्रवाह ज्या भागात होता ती जागा शोधण्यात यश आलं आहे.
हा शोध लुप्त झालेल्या संस्कृतीचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज थारचं वाळवंट कोरडं आणि शुष्क आहे, पण त्या जागी नदी आढळल्याने लाखो वर्षांपूर्वी तिथलं जनजीवन वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही..






