चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आख्या जगाला भंडावून सोडले आहे. गेल्या सात महिन्यांत आपल्यातल्या प्रत्येकाच्या मित्रमंडळींपैकी, नातेवाईकांपैकी कोणाला ना कोणाला ह्या विषाणूची लागण झाल्याचे आपण सर्वांनी ऐकले आहे. काही लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंही आहे. काही लोकांना आपल्या मित्र आणि आप्तेषांचं अंत्यदर्शनही घेता आले नाही. अंत्यविधी करता आले नाहीत की सांत्वन करण्यासाठी कोणाकडे जाता आले नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ही सल आहेच.
कोरोनामुळे आपल्यातून निघून गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ अमेरिकेत ४ ऑक्टोबर २०२० रोजी पहिला राष्ट्रीय कोविड-१९ स्मृतिदिन पाळण्यात आला. व्हाईट हाऊसच्या मागे २०,००० रिकाम्या खुर्च्या ठेवण्यात आल्या. यातली प्रत्येक खुर्ची कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या दहा लोकांचे प्रतिनिधित्व करत होती. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७८ लाखांच्या आसपास आहे. पैकी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २१ लाखांच्या आसपास आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि ज्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता.






