कृती:
१. साहित्य जमवले कि सारे साहित्य एका भांड्यात मस्त मिक्स करून घ्या. अगदी एकजीव मिसळून चांगले सैलसर भिजवून घ्या. सारणाची चव घेऊन बघा. काही कमी-अधिक प्रमाणात हवे असल्यास घालून मिश्रण तयार ठेवा.
२. लाकडी पाटावर किंवा परातीला उपडे करून स्वच्छ पुसून त्यावर अळूचे मोठे पान पाठच्या बाजूने पसरा.
३. मिश्रण हाताने पूर्ण पानावर व्यवस्थित पसरवा. अगदी पातळ किंवा अगदी जाड थर नको.
४. दुसरे पानही उलट्या बाजूने, पण आधीच्या पानाच्या टोकाच्या विरूद्ध दिशेने अशाप्रकारे पानावर ठेऊन त्या पानालाही मिश्रण व्यवस्थित लावा. अशा पध्दतीने एक उलट आणि एक सुलट पाने लावून घ्या.
५. सर्व पाने लावून झाल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने मधल्या बाजूला अळूची लावलेली पाने अलगद दुमडा. परत उरलेल्या मिश्रणाचा हात ह्या दुमडलेल्या भागावर हलकेच लावा. त्यामुळे अळूरोल वळताना सर्व पाने व्यवस्थित चिकटून राहतील.
६. हळूहळू करत अळूरोल खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे मस्तपैकी गोलाकार वळून किंवा दुमडून घ्या. वळताना मधेमधे मिश्रणाचा हात हलकेच फिरवत रहा.
७. एक रोल वळून झाला की शेवटच्या टोकाला पण मिश्रणाचा हात लावून एकदम पसरट करायचे आणि थोडेसे वळलेल्या रोलच्या डाव्या-उजव्या बाजूला पण लावावे.
८. उकड काढायचे पात्र धुवून पाणी घालून उकळत ठेवा. वरच्या भांड्याला थोडासा तेलाचा हात फिरवून अळूचे रोल/ सुरळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा तऱ्हेने ठेवा आणि पंधरा मिनिटे वाफवून घ्या.
९. अळू रोल थोडे थंड होऊ द्या आणि मग धारदार सुरीने मध्यम आकाराचे काप करून घ्या. नुस्ती वाफवलेली अळूवडीदेखील मस्त लागते हं.. आवडत असल्यास एखाद-दुसरी नक्की खा.
१०. तेल गरम करून एक-एक वडी सोडून छान शॅलो फ्राय करून घ्या. आवडत असल्यास तळत असताना थोडेसे तीळ वरून भुरभुरवा.
११. कधीकधी अळूवडीचे पदर सुटतात. म्हणून वडी नेहमी अलगद तळावी. मध्यम ते जास्त आचेवर तळावे. अशा तळलेल्या अळूवड्या मस्त कुरकुरीत होतात. काहींना कुरकुरीतपेक्षा जरा लुसलुशीत आवडते, त्यांनी जरा कमी वेळ तळून अळूवडी बाहेर काढा.
१२. तळलेल्या वड्या टिश्यूपेपरवर काढल्या की जास्तीचे तेल टिपले जाईल. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे खवलेले खोबरे टाकून सजवा.
आता तयार कुरकुरीत अळूवडी छानपैकी ताटामधे इतर पदार्थांच्या सोबत वाढा आणि आवडीने खाऊन आनंद घ्या. मग करून बघणार ना?