आईला गिफ्ट द्यायला तशी कुठल्या मातृदिनाची गरज नाही. पण तसेही आपल्याला घरच्यांसाठी एखादी भेटवस्तू घ्यायला काही ना काही कारण लागतंच की. कधी ते आपल्या पारंपारिक भारतीय सणांचं असतं तर कधी ’मदर्स डे’ सारख्या दिवसांचं.
मदर्स डे उद्या आहे. त्यामुळं अजूनही काही खरेदी झाली नसली तरी वेळ अजून गेली नाही. तुमच्याकडे तुमच्या आईच्या आवडीनिवडीनुसार काही गिफ्टिंग आयडियाज असतीलच. त्यात भर या आमच्या आयडियांची..
१. साडी !
भेट देण्यासाठी साडी हा हमखास यशस्वी होणारा प्रकार आहे. शिवाय त्यात इतकी व्हरायटी आहे की काय घ्यावं हा प्रश्नच पडत नाही. तसंही तुम्ही तुलना केलीत तर ड्रेसेसच्या तुलनेत साड्या खूप टिकतात आणि मग कधीतरी कपाट आवरताना, ’ही साडी अमक्याच्या लग्नात घेतेलेली’, ’ही साडी मुलीच्या पहिल्या पगाराची भेट’.. असल्या आठवणी हमखास निघतात.
साडीमध्येही नेहमीची भरजरी साडी न घेता कश्मिरी वर्क, कांथा , कसुती म्हणजेच आपला कर्नाटकी कशिदा, पोचमपल्ली, ज्यूट सिल्क, बालुचेरी असे काहीतरी वेगळे प्रकार घेता येतील. सध्या लिननच्या साड्यांचीही चलती आहे.
२. दागिने !
साडी आली म्हणजे दागिने आलेच. मोत्यांचं नाजूकसं कानातलं किंवा एक-दोन पदरी माळ कोणत्याही साडी आणि ड्रेसवर शोभून दिसते. झालंच तर एखादं ब्रेसलेटही घेऊ शकता. पूर्वी बोअर वाटणारी बोरमाळ आजकाल खूप चलतीत आहे. त्यातही चांदीचं फिनिश असलेले दागिने डिमांडमध्ये आहेत.
३. फिटनेस बँड !
तुमच्या आईला फिटनेसची आवड असेल तर एखादा छानसा फिटनेस बँड त्यांना भेट द्या. बँड मोबाईलसोबत जोडल्यावर हार्ट रेट, किती तास गाढ झोप लागली, आपण किती पावलं चाललो, हे सगळं बघत राहाणं हा मस्त विरंगुळा असतो.
४. पुस्तक !
वाचनाची आवड असलेल्या आईला काय भेट द्यावी हा प्रश्नच येत नाही. एखादं खूप आवडतं पण आता कुणाकडूनतरी हरवलेलं, वाचायचं आहे पण घेऊ घेऊ म्हणत अजूनपर्यंत विकत न घेतलेलं... असं कोणतंही छानसं पुस्तक तुम्ही आईला भेट देऊ शकाल.
५. स्पा !
स्पामध्ये जाऊन मसाज घेण्यासारखं शरीराचं दुसरं कुठलंच कौतुक नसेल. मसाजनंतर तुमच्या आईला भारी तरतरी येईल आणि शरीराचा सारा थकवा दूर होईल.
६. छंदवर्ग !
हे तुमच्या लहानपणचे छंद वर्ग नव्हेत हं. तेव्हा कदाचित आईनं तुम्हाला तुमच्या आवडीच्या नसलेल्या छंदवर्गाला जबरदस्तीनं पाठवलं असण्याची शक्यता आहे. पण त्याचा बदला घेण्याची ही वेळ नव्हे. मुलांना मोठं करताना, घरच्या जबाबदार्या सांभाळताना किंवा नोकरीमुळं कदाचित तुमच्या आईला तिचा छंद जोपासायला वेळ मिळाला नसेल. तेव्हा असा छंदवर्ग शोधून तिथं आईचं नांव नोंदवून येणं. किंवा त्या छंदाशी निगडीत वस्तू आईसाठी आणणं हे तुम्ही नक्की करू शकाल. तुमची आई तेव्हा जामच खूष होईल.
७. छानशी संध्याकाळ !
तुम्ही आईच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये बुकिंग, तिच्यासोबत पार्कात किंवा तिथे असेल तर समुद्रकिनारी फिरायला जाणं अशा गोष्टींसाठी तुमची संध्याकाळ आईसाठी राखून ठेऊ शकाल. रात्री उशीरा आईस्क्रीम खायला जाणं हा ही एक उत्तम पर्याय आहे. अगदीच महागड्या हॉटेलातही जायची गरज नाही. अगदी खाऊगल्लीतली भेळ आणि पाणीपुरीपण तुमच्या आईला भरपूर आवडत असेल.
आणि हो, यासाठी काही रजा घ्यायचीही गरज नाही. तसेही पाश्चात्यांचे हे दिवस रविवारी असतात आणि तेव्हा आपल्याला सुटी असते.
८. मी आणि आई सॉलिड टीम !
हा पर्याय मात्र फक्त मुलींसाठीच आहे. आईसोबत मॅचिंग साडी किंवा ड्रेस तयार करून घ्या आणि सगळीकडे मस्त मिरवा.
पण हो, आपले प्लॅन आखताना आईचे स्वत:चे प्लॅन्स काय आहेत हे हळूच जाणून घ्या. नाहीतर तुमचे प्लॅन्स आखता-आखता तुम्ही आईच्या स्वत:च्याच प्लान्सची वाट लावाल.












