भारतात घोड्यांबद्दल पुरातन काळापासून आकर्षण आहे. युद्ध असो की दळणवळण घोड्यांचा सर्वात जास्त वापर केला जायचा. आजही भारतात घोड्यांबद्दल आकर्षण कमी झालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी लाखो करोडोंचे घोडे विकले जात असतात. आज हे सांगायचं कारण म्हणजे आज आम्ही आम्ही जगातल्या सर्वात सुंदर जातीच्या घोड्याची ओळख करून देणार आहोत. या घोड्याची जात अखल टेके या नावाने ओळखली जाते. चला तर आता सविस्तर जाणून घेऊ या !!
अखल टेके: जगातील सर्वात सुंदर घोडे....या घोड्यांच वैशिष्ट्य काय? ते इतर घोड्यांपेक्षा वेगळे कसे आहेत?


घोड्याची अखल टेके ही जात तुर्कमेनीस्तान येथे पाहायला मिळते. या घोड्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चमकणारे शरीर. उन्हात जर या घोड्याला उभे केले तर त्याचे शरीर चकाकते. ते नुसते चकाकत नाही तर त्याला एक झळाळी असते. साहजिक या गोष्टीमुळे त्याचे सौंदर्य उठावदार दिसते. हे घोडे विविध रंगांमध्ये पाहायला मिळतात. काळे, तपकीरी तसेच इतर रंगांमध्ये देखील हे घोडे दिसतात. रंग कुठलाही असो त्यांची चमक मात्र प्रत्येक रंगात तेवढीच उठून दिसते. अखल टेके नावाच्या या जातीच्या घोड्यांमधील विशिष्ट जीन्स हेच त्यांच्या या चमकदार शरीरयष्टीचे कारण आहे.

जगातील सर्वात सुंदर घोडे एवढीच या घोड्यांची ओळख नाही तर हे घोडे अतिशय कणखर समजले जातात. घोड्यांचा समावेश असलेल्या खेळांमध्ये देखील याच घोड्यांना प्राधान्य दिले जाते. या घोड्यांची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय तल्लख असतात. त्यांना प्रेमाने हाताळले तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागतील पण दमदाटी केली तर मात्र कुणाच्या हाताला ते लागत नाहीत.

एवढे सुंदर आणि ताकदीचे असलेले घोडे जगात मोठ्या संख्येने असायला हवेत अशीच कुणाचीही इच्छा असणार, खरे तर या घोड्यांची संख्या अगदी जेमतेम उरली आहे. काही अहवालांनुसार त्यांची संख्या ही संपूर्ण जगात ६,६०० एवढीच आहे, तर काही अहवाल फक्त ३,५०० हजार असल्याचे सांगतात. यापैकी कुठलीही संख्या गृहीत धरली तरी ती समाधानकारक दिसत नाही हे देखील तितकेच सत्य आहे.

अखल टेकेच्या मूळ स्थानाबद्दल साशंकता असली तरी एक समजुतीनुसार अनेक वर्षांपासून तुर्कमेनीस्तानचे स्थानिक लोक घोडेस्वारीसाठी या घोड्यांचा वापरत करत होते. सहनशक्ती हा अजून एक त्यांचा मोठा गुणधर्म सांगता येईल. ऊन असो, दुष्काळी परिस्थिती असो की कोरडी थंडी, हे घोडे कोणत्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने राहू शकतात. कित्येक दिवस तर पाण्याविनही ते जिवंत राहू शकतात. या घोड्यांबद्दल सांगितली जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे ते एकाच दिवसांत ८० ते १०० मैल एवढे अंतर पार करून जात असत. या घोड्यांना चक्क स्वर्गातून आलेले घोडे म्हटले जाते यात आश्चर्य नाही.
तर, सुंदर दिसण्यापासून ते प्रचंड शारीरिक क्षमतेपर्यंत अखल टेके खास आहे. समजा सारंगखेडा येथे हे घोडे विकायला आलेच तर तुम्ही घ्याल का? काय म्हणता?
आणखी वाचा:
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१